Sun, May 26, 2019 18:48होमपेज › Goa › म्हापशात दुकानाला आग

म्हापशात दुकानाला आग

Published On: Feb 18 2018 1:57AM | Last Updated: Feb 18 2018 1:57AMम्हापसा : वार्ताहर

म्हापसा पालिका बाजारपेठेच्या मागे मरडवाड्याच्या बाजूने असलेल्या एस.आर. ट्रेडसेंटरच्या इमारतीच्या तळघरात असलेल्या साई एंटरप्रायजेस या वीज साहित्याच्या दुकानाला आग लागून दुकानातील साहित्य जळून खाक झाले. यात सुमारे 15 लाखांची हानी झाल्याचा दावा मालक जितेंद्र बोहाटे यांनी केला आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणल्याने जवळची दुकाने आगीपासून वाचली. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

अग्निशमन दलाकडून मिळालेली माहिती अशी की, शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दुकानाला आग लागली. दुकानमालक दुकान बंद करून जेवणासाठी गेला होता. दुकानातून धूर येत असल्याचे पाहून जवळच्या दुकानदाराने बोहाटे यांना आगीची माहिती दिली. अग्निशमन दलाला आगीची माहिती मिळताच पाण्याच्या बंबसह अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. मुख्यालयातील दलाचे जवानही बंबासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांना तळघर धुराने भरलेले दिसले. तेथे व्हेंटिलेशनची व्यवस्था नसल्याने धूर बाहेर निघत नव्हता. तशा स्थितीत त्यांनी आत प्रवेश केला व दुकानाचे शटर कापून पाण्याचे फवारे मारुन आग विझविली. त्यामुळे जवळची दुकाने बचावली. या दुकानासमोर असलेल्या साडी मॅचिंग सेंटरच्या गोदामालाही आगीची झळ पोहोचली. दुकानाच्या शटरचा रॉड गरम होऊन वाकल्याने दुकान उघडणे अशक्य झाले व हानीचा अंदाज घेता आला नाही.

अग्निशमन दलाचे येथील प्रमुख बॉस्को फेर्राव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकारी डी. एस. सावंत, जे. एस. कांदोळकर, एस. एम. राणे, वाय. ए. नाईक, ए. व्ही. नाईक, ई डायस, रोहन नाईक, विवेक सावंत, सुनील देसाई (सब ऑफीसर), रामदास हळदणकर, ए. बी. भोमकर, सर्वेश गावकर व इतरांनी आग विझविली. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण सावंत यांनी पंचनामा केला. 

इमारतीच्या तळघरात असलेल्या बहुतेक दुकानांचे रुपांतर गोदामात करण्यात आले आहे. यामुळे आग विझविताना अग्निशमन दलाला अडचण  आली. या इमारतीच्या तळघरातील दुकानदारांनी पालिकेकडून व्यापारी परवानेे घेतले आहेत की नाही याची चौकशी करावी लागेल, असे मत नगराध्यक्ष रोहन कवळेकर यांनी नगरसेवक राजसिंग राणे यांच्यासमवेत घटनास्थळी भेट देऊन पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.