Thu, Jun 20, 2019 01:02होमपेज › Goa › ‘ईएसजी’चे चित्रपटांसाठी अर्थसहाय्य

‘ईएसजी’चे चित्रपटांसाठी अर्थसहाय्य

Published On: Jul 29 2018 1:21AM | Last Updated: Jul 28 2018 11:51PMपणजी : प्रतिनिधी

गोवा मनोरंजन संस्थेतर्फे  1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2017  या कालावधीत निर्मिती झालेल्या चित्रपटांना आर्थिक सहाय्य देण्याकरिता अर्ज मागविण्यात आले आहेत. चित्रपट निर्मात्यांना 27 ऑगस्ट 2018  रोजी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख देण्यात आली आहे, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र तालक यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

तालक म्हणाले, की  गोव्यातील चित्रपट निर्मात्यांनी बनविलेल्या कोकणी व मराठी फीचर चित्रपट आणि कोकणी, मराठी, हिंदी व इंग्रजी नॉन फीचर चित्रपटांसाठी ही योजना लागू आहे. सर्व चित्रपटांना इंग्रजी उपशिर्षक असावेत. तसेच  1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2017  या कालावधीचे सेन्सॉर प्रमाणपत्र महत्त्वाचे आहे. कोकणी व मराठी फीचर चित्रपटांना अ श्रेणीत रु. 50 लाख, ब श्रेणीत रुपये 30 लाख आणि क श्रेणीत रु. 10 लाख किंवा लेखापरीक्षित विवरणानुसार झालेला एकूण खर्चाच्या 50% आणि सादर केलेले आयकर विवरण यापैकी जे कमी असेल त्यानुसार अर्थसाह्य दिले जाईल.

कोकणी, मराठी, हिंदी व इंग्रजी नॉन फीचर चित्रपटांसाठी अ श्रेणीसाठी रु. 10 लाख, ब श्रेणीसाठी रु. 5 लाख आणि क श्रेणीसाठी रु. 3 लाख किंवा  लेखापरीक्षित विवरणानुसार झालेल्या एकूण खर्चाच्या 50% आणि सादर केलेले आयकर विवरण यापैकी जे कमी असेल त्यानुसार सहाय्य दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.

राज्य  सरकारच्या मंजुरीने  राज्या बाहेरील चित्रपट तज्ज्ञांच्या 5 सदस्यीय समितीद्वारे या चित्रपटांचे मूल्यमापन केले जाईल. फीचर व नॉन फीचर प्रकारांमध्ये जे चित्रपट अ, ब व क श्रेणीखाली येणार नाहीत त्यांना अनुदान दिले जाणार नाही. चित्रपट आर्थिक सहाय्य योजना पात्रता आणि अर्जांसाठी  संकेतस्थळावरील फॉर्म पहावा, असे त्यांनी सांगितले.

सर्वोत्कृष्ट  चित्रपट विभागीय श्रेणीत राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या फीचर चित्रपटांच्या निर्मात्यास रु. 20 लाखांचे अधिक सहाय्य देण्यात येईल. कोणत्याही अन्य सर्वोत्कृष्ट चित्रपट श्रेणीतील राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाला रु. 20 लाख, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाला 25 लाख रुपये,  राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये गोल्डन लोटस पुरस्कार विजेत्या फीचर चित्रपटास रु. 30 लाख दिले जातील.  एफआयएपीएफ द्वारा मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार विजेत्या नॉन फीचर चित्रपटाला रु. 7.50 लाख आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटास रु. 5 लाख दिले जातील, असे तालक यांनी सांगितले पत्रकार परिषदेत सचिन चाटे, संदीप कुंडईकर उपस्थित होते.