Tue, Apr 23, 2019 09:55होमपेज › Goa › खाणींचा लिलाव न करता फेरविचार याचिका दाखल करा

खाणींचा लिलाव न करता फेरविचार याचिका दाखल करा

Published On: Feb 17 2018 2:06AM | Last Updated: Feb 17 2018 12:18AMपणजी : प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता राज्यातील खाणींचा लिलाव न करता राज्य सरकारने फेरविचार याचिका दाखल करावी, असा ठराव काँग्रेस विधिमंडळ गटाच्या शुक्रवारी  झालेल्या बैठकीत घेण्यात आला. विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांनी ही  माहिती दिली. 

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून त्यात विरोधी पक्ष या नात्याने काँग्रेसची व्यूहरचना ठरवण्यासाठी  काँग्रेस विधिमंडळ गटाची पर्वरीत  बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना कवळेकर म्हणाले की, भाजप आघाडी सरकारच्या मागील एक वर्षाची कामगिरी आणि न पाळलेली आश्‍वासने  अधिवेशनात उघड करण्याचे काँग्रेसने ठरविले आहे. गोव्यातील अनेक ज्वलंत प्रश्‍न व समस्यांवर सरकारचे धोरण कसे असावे, आणि त्याबाबतीत अधिकाधिक जनतेचे हित जपण्यासाठी सरकारवर दबाव आणण्याचेही बैठकीत ठरविण्यात आले. अधिवेशनात म्हादई जलतंटा प्रकरण, खाणींचा लिलाव, कोळसा प्रदूषण, नद्यांचे राष्ट्रीयीकरण, लोककल्याणकारी योजना आदींबाबत सरकारला घेरण्याचे ठरवण्यात आले आहे.

प्रतापसिंह राणे म्हणाले की, खाणींचा लिलाव झाल्यास कोणीही गोव्यात येऊन खाणी चालवण्यास घेतील. यामुळे स्थानिक लोकांना रोजगार आणि अन्य व्यवसायात उपरे म्हणून रहावे लागण्याची शक्यता आहे. खाण व्यवसाय  लवकरात लवकर सुरू होणे गरजेचे आहे. 

आलेक्स रेजिनाल्ड यांनी खाणींच्या लिलावाच्या बाजूने मत मांडताना सांगितले की, राज्याच्या हिताच्या आणि महसुलाच्या दृष्टीने खाणींचा लिलाव होणे महत्वाचे आहे. मात्र, लिलावात गोमंतकीय खाण मालकांना प्राधान्य देण्याबाबत अटी घालण्यासंबंधी सरकारने धोरण निश्‍चित केले पाहिजे. यासंबंधी अधिवेशनात सर्व आमदारांचे एकमत होणेही गरजेचे आहे. 

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आजारी असल्याने मुंबईला लिलावती इस्पितळात दाखल झाल्याचा विषयही काँग्रेसच्या शुक्रवारच्या बैठकीत चर्चेला आला. पर्रीकर यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी व ते अधिवेशनात दाखल व्हावेत, अशा भावना बैठकीत व्यक्त करण्यात आल्याचे  सूत्रांनी सांगितले. 

सिक्‍वेरांचा पुतळा ः सभापतींकडे विचारणा करणार

डॉ. जॅक सिक्‍वेरा यांचा पुतळा विधानसभा संकुलात उभारण्यासाठी सर्व 16ही काँग्रेस आमदारांची सही असलेला खासगी ठराव दिला असला तरी त्यावर सभापतींकडून काहीही अधिकृत निर्णय कळविण्यात आलेला नाही. याबाबतीत पहिल्याच दिवशी माहिती न मिळाल्यास सभापती प्रमोद सावंत यांना विचारणा केली जाणार आहे.  तो ठराव रद्दबातल ठरवला गेला असेल तर त्याचा जाब सभापतींना विचारला जाईल, असे कवळेकर यांनी सांगितले.