पणजी : प्रतिनिधी
गोवा पर्यटन खाते व गोवा पर्यटन विकास महामंडळा (जीटीडीसी)तर्फे पणजीत ग्रेप एक्सपेड व गोवा विंटेज कार व बाईक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा 14 वा ग्रेप एक्सपेड हा महोत्सव 19 ते 22 एप्रिल दरम्यान कांपाल पणजी येथील डी.बी.बांदोडकर मैदानावर होईल. गोवा विंटेज कार व बाईक महोत्सव 29 एप्रिल रोजी पणजी येथील आयनॉक्स कोर्टयार्ड येथे होणार आहे, अशी माहिती पर्यटन खात्याच्या सूत्रांनी दिली.
ग्रेप एक्सपेड या चार दिवसीय महोत्सवात द्राक्षांपासून तयार केलेले विविध पेय चाखण्याची संधी लोकांना मिळणार आहे. या महोत्सवात गोव्याचे पारंपरिक अन्न चाखण्याबरोबरच गोव्याच्या संस्कृतीची झलकही अनुभवण्यास मिळणार आहे. या महोत्सवात खाद्यपदार्थांचे अनेक स्टॉल्स उभारले जाणार आहेत. स्थानिकांबरोबरच देशी-विदेशी पर्यटकांची मोठी उपस्थिती तेथे अपेक्षित आहे. लोकांना एकाच महिन्यात दोन वेगवेगळ्या पर्वणी अनुभवण्याची संधी मिळणार आहे.
गोवा विंटेज कार व बाईक महोत्सवात विंटेज कार व बाईक पाहण्याची संधी मिळणार आहे. विंटेज कार व बाईकच्या महोत्सवादिवशी पणजी शहरात मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. आयनॉक्स कोर्टयार्ड ते मिरामार सर्कल व दिवजा सर्कल व पुन्हा परत आयनॉक्स कोर्टयार्ड अशी ही मिरवणूक असणार आहे. त्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. संध्याकाळच्या वेळी फॅशन शो व मनोरंजनात्मक कार्याक्रमही होतील,अशी माहिती पर्यटन खात्याच्या सूत्रांनी दिली.
Tags : Festival , Garp Exped,Panjit ,goa news