Thu, Apr 25, 2019 23:28होमपेज › Goa › मासळी न उतरल्याने कुटबण जेटीवर तणाव

मासळी न उतरल्याने कुटबण जेटीवर तणाव

Published On: Aug 13 2018 1:20AM | Last Updated: Aug 13 2018 12:13AMमडगाव : प्रतिनिधी

कुटबण जेटीवरील ट्रॉलर्स मालक आणि मासळी दलालांमधील गटबाजीचा फटका रविवारी दहा टन मासळी घेऊन आलेल्या दोन ट्रॉलर्सना बसला. उच्च न्यायालयाच्या आदेशावरून मच्छीमारी खात्याने मासेमारी करून येणार्‍या प्रत्येक ट्रॉलरला टोकन पद्धत लागू करण्याचा निर्णय घेतला होता. या पद्धतीला विरोध करणार्‍या दलालांनी रविवारी मासळी घेऊन आलेल्या ट्रॉलरमधील मासळी खरेदी करण्यास नकार दिल्याने रविवारी रात्री उशिरापर्यंत मासळी जेटीवर उतरू शकली नाही. जेटीवर तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिस बंदोबस्त पुरविण्यात आला आहे.

केपेचे उपजिल्हाधिकारी उत्तम राऊत देसाई यांनी मध्यस्थी करून वाद मिटविण्यासाठी प्रयत्न केले होते. पण, रात्री उशिरापर्यंत वाद शमला नव्हता. पोलिस निरीक्षक नावलेश देसाई आणि इतर पोलिस परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. सोमवारी (दि. 13) सकाळी या विषयावर बैठक आयोजित करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे कुटबण जेटीवर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कुटबण जेटीवरील दलालांच्या मक्‍तेदारीवरून गेले अनेक दिवस वाद सुरू आहे.     

उच्च न्यायालयाने या वादावर तोडगा काढण्यासाठी सदर जेटी मच्छिमारी खात्याने ताब्यात घ्यावी, असा निर्णय दिला होता. मच्छिमारी खात्याने समुद्रात मासेमारी करून जेटीवर येणार्‍या ट्रॉलर्सना टोकन पद्धत लागू केली होती. सध्या टोकन पद्धतीला विरोध करणारे दलाल आणि काही ट्रॉलर्स मालक आणि मत्स्योद्योग खात्याच्या नियमाला समर्थन देणारे ट्रॉलर्स मालक असे दोन गट तयार झाले आहेत. विरोधी गटातील दलाल समर्थक गटातील ट्रॉलर्स मालकांचे मासे घेण्यास तयार नाहीत, अशी परिस्थिती जेटीवर सुरू आहे.

या वादाच्या पार्श्वभूमीवर रविवारी दोन ट्रॉलर्स सुमारे दहा टन मासळी घेऊन कुटबण जेटीवर सकाळी दहा ते दुपारी तीन वाजता पोचल्या होत्या. पण दलालांनी मासळी खरेदी करण्यास नकार दिल्याने सर्व मासे सायंकाळी आठ वाजेपर्यंत ट्रॉलर्समध्ये अडकून पडले होते. या विषयावरून दोन्ही गटांत वाद निर्माण झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्याने अखेर केपेचे उपजिल्हाधिकारी उत्तम राऊत देसाई पोलिस कुमक घेऊन कुटबण जेटीवर दाखल झाले. त्यांनी बराच वेळ दोन्ही गटांशी चर्चा करून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.

प्राप्त माहितीनुसार कुटबण जेटीवरील काही ट्रॉलर्स मालक स्वत: मासळीचे दलाल म्हणूनही काम करतात, त्यांना पूर्वीप्रमाणे जागा अडवून मासळी उतरवायची आहे. सध्या मत्स्योद्योग खात्याने  मासेमारी करून जेटीवर प्रथम पोचणार्‍या ट्रॉलरला प्राधान्य देण्याचा नियम लागू केला आहे. त्यामुळे उशिरा पोचणार्‍या ट्रॉलर्सना आपली वेळ येईपर्यंत वाट पहात थांबावे लागत आहे. या पध्दतीला विरोध करणार्‍या दलालांनी आणि दलालीचे काम करणार्‍या काही ट्रॉलर्स मालकांनी रविवारी मासे घेऊन परतलेल्या त्या दोन ट्रॉलर्समधील मासळीच्या लिलावात  सहभाग घेण्यास नकार दिला. त्यामुळे रविवारी सकाळी सुमारे दहा टन मासळी घेऊन आलेले दोन ट्रॉलर्स तसेच पाण्यात होते. रात्री आठ वाजेपर्यंत ट्रॉलर्समधील मासळी खाली उतरविण्यात आली नव्हती.

कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ट्रॉलर्स मालक संघटनेचे अध्यक्ष सावियो डिसिल्वा यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले की, मासळीचा लिलाव न झाल्याने रविवारी सकाळी दहा ते रात्री आठपर्यंत मासळी नऊ तासांपेक्षा जास्त काळ तशीच पडून होती. सायंकाळी मासळी खराब होऊ लागली होती. शिवाय श्रावण मासाला सुरवात झाल्याने मासळीला खपसुद्धा येणार नाही. या स्थितीत ट्रॉलर मालकांना मोठ्या नुकसानाला तोंड द्यावे लागणार  आहे. या वादावर तोडगा निघण्याची शक्यता नसल्याने रात्रभर मासळी तशीच ट्रॉलरमध्ये पडून राहणार आहे.