Tue, Apr 23, 2019 01:38होमपेज › Goa › शेतकर्‍यांनी सरकारी योजनांचा लाभ घ्यावा

शेतकर्‍यांनी सरकारी योजनांचा लाभ घ्यावा

Published On: Apr 06 2018 1:28AM | Last Updated: Apr 06 2018 1:01AMहळदोणा : वार्ताहर

तरूणांनी सरकारी नोकर्‍यांचा आग्रह न धरता कृषी क्षेत्राकडे वळल्यास रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. सरकारकडून शेतकर्‍यांसाठी भरघोस अनुदान देण्यात येत आहे. शेतकर्‍यांनी सरकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन हळदोणेचे आमदार  ग्लेन टिकलो यांनी  केले.बस्तोडा येथे रविवारी आयोजित केलेल्या शेतीविषयक मार्गदर्शन कार्यक्रमात आमदार टिकलो बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डेक्कन फाईन्स केमिकल्सचे व्यवस्थापक  किरण देसाई, उपसरपंच मनिषा नाईक, पंचायत सदस्य प्रतिक्षा मयेकर, सुनिता लोटलीकर, राजेंंद्र नारोजी, राजेश पिळणकर, रणजीत उजगांवकर उपस्थित होते.

बस्तोडा येथील 15 शेतकर्‍यांनी प्रायोगिक तत्वावर कलिंगडाची लागवड करून  कलींगडाचे  भरघोस उत्पादन घेतल्याबद्दल आमदार टिकलो यांनी शेतकर्‍यांचे अभिनंदन केले.डेक्कन फाईन केमिकल्स कंपनी आणि बस्तोडा पंचायत यांच्या संयुक्‍त विद्यमाने बस्तोडा येथील 15 शेतकर्‍यांतर्फे कलिंगडाची लागवड योजना राबवण्यात आली.  शेतकर्‍यांनी पिकविलेली तीन हजार  कलींगडे बाजारात उपलब्ध करण्यात आली. पुढील मोसमात सुमारे तीन लाख कलिंगडाचे उत्पादन केले जाईल, असे  उद्दीष्ट  शेतकर्‍यांनी ठेवले असल्याचे सरपंच सावियो मार्टीन्स यांनी  सांगितले.

किरण देसाई म्हणाले, की   शेतकर्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी कंपनीतर्फे अनेक योजना राबवण्यात येत आहेत. आमदार ग्लेन टिकलो व सरपंच सावियो मार्टीन्स यांनी बस्तोडा येथील शेतकर्‍यांना कलिंगडाचे पीक घेण्यासाठी बोलणी केल्यानंतर कंपनीतील कृषी पदवीधर महेश परब, अमित लाड, तेजस चव्हाण व केशव माळी यांच्या मार्गदर्शनाखाली   शेतकर्‍यांना कलिंगड उत्पादनाचे  मार्गदर्शन करण्यात आले. शेतकर्‍यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे मशागत केल्यामुळे पीक चांगले आले.रणजीत उजगांवकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.  उपसरपंच मनिषा नाईक यांनी आभार मानले.

Tags : Goa, Farmers, advantage, government schemes