Fri, Apr 19, 2019 07:59होमपेज › Goa › शेतजमीन रुपांतरण विधेयक विधानसभेत मांडणार 

शेतजमीन रुपांतरण विधेयक विधानसभेत मांडणार 

Published On: Jul 01 2018 1:52AM | Last Updated: Jul 01 2018 12:12AMपणजी : प्रतिनिधी

गोव्यातील लागवडीखालील  शेतजमिनी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. भावी पिढीसाठी जमिनी वाचवण्याची तसेच त्यांच्या संरक्षणाची गरज आहे. विधानसभेच्या आगामी  पावसाळी अधिवेशनात ‘गोवा शेतजमीन रुपांतरण विधेयक 2018’ आपण मांडणार आहोत, असे काँग्रेस आमदार लुईझिन फालेरो यांनी पणजी येथे पत्रकार परिषदेेत  सांगितले. गोव्याला विशेष दर्जा मिळालाच पाहिजे. सरकारने विशेष दर्जा देण्यासंदर्भात केवळ आश्‍वासने देऊ नयेत, तर गोव्याला विशेष दर्जा देण्यासाठी सरकारने प्रयत्न  करावा, असेही ते म्हणाले.  

फालेरो म्हणाले,  यापूर्वी राज्यात आलेल्या प्रत्येक सरकारने गोव्याला विशेष दर्जा देण्याचे आश्‍वासन दिले होते. काँग्रेस सरकारनेदेखील तसे आश्‍वासन दिले होते. मात्र, ते पूर्ण होऊ शकले नाही. भारतीय जनता पक्षानेदेखील  लोकसभा निवडणुकीच्या काळात  गोव्याला विशेष दर्जा देण्याचे आश्‍वासन दिले होते. राज्यात व केंद्रात भाजप सरकार असल्याने या आश्‍वासनाची पूर्तता होणे अपेक्षित होते. गोव्याला विशेष दर्जा देण्याविषयी  गोवा विधानसभेत एकमताने ठरावदेखील मंजूर करण्यात आला  होता. परंतु त्या ठरावावर पुढे काहीच कार्यवाही झाली नसल्याची टीका फालेरो यांनी केली.

घर बांधायचे असल्यास जमिनीचे दर गगनाला भिडले असल्याने ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. राज्यात सध्या शेतजमीन राहिली असून तिचे संवर्धन होणे आवश्यक असल्याचे फालेरो यांनी सांगितले. त्यादृष्टीने राज्यातील शेतजमिनीचे संरक्षण करण्यासाठी जुलै महिन्यात   होणार्‍या राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात ‘गोवा शेतजमीन रुपांतरण विधेयक 2018’ हे खासगी विधेयक आपण मांडणार आहे. याबाबतचे निवेदन आपण मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनाही सादर करणार आहे. विधानसभेत मांडण्यात येणारे हे विधयेक सरकारने कुठल्याही अडथळ्याशिवाय मंजूर करावे. या विधेयकामुळे   शेतजमिनींचे संरक्षण करण्यासाठीची निश्‍चित एक दिशा प्राप्‍त होईल, असेही फालेरो म्हणाले. यावेळी प्रदेश काँग्रेसचे  पदाधिकारी अ‍ॅड. यतीश नाईक व विजय पै उपस्थित होते.