पणजी : प्रतिनिधी
सांगे येथील विनयभंग झालेल्या पीडित अल्पवयीन युवतीची ओळख सार्वजनिक केल्याचा ठपका ठेवून प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो यांच्याविरोधात खोट्या तक्रारी दाखल केल्या जात आहेत, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते संकल्प आमोणकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
कुतिन्हो यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या या खोट्या तक्रारींचा निषेध व्यक्त करून सरकार विरोधात त्या अवाज उठवतात म्हणून त्यांचा आवाज दाबण्यासाठीच हे सर्व केले जात आहे, असेही आमोणकर म्हणाले.
आमोणकर म्हणाले, की काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांना भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी धमकी दिली होती. परंतु त्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. उलट कुतिन्हो या महिलांवर होणार्या अन्याया विरोधात लढा देतात. परंतु त्यांच्याच विरोधात खोट्या तक्रारी दाखल केल्या जात आहेत.
कुतिन्हो यांच्या विरोधात तक्रारी दाखल करणार्या या महिलाच आहेत.पीडित अल्पवयीन मुलीची ओळख त्यांनी सार्वजनिक केली नाही. पीडितेची केवळ भेट घेऊन तिला न्याय देण्याचा कुतिन्हो यांचा हेतू होता. त्या चांगले काम करीत असल्याने त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल जात आहे, असेही आमोणकर म्हणाले.
काँग्रेसचे नेते विठ्ठू मोरजकर म्हणाले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चोडणकर यांना जेव्हा धमकी देण्यात आली, तेव्हा म्हापसा व पणजी पोलिस स्थानकात तक्रार करण्यात आली होती. परंतु या तक्रारीवर अजूनही कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. मात्र, महिलांवर होणार्या अन्यायाविरोधात आवाज उठवणार्या कुतिन्हों विरोधात तक्रारी दाखल केल्या जात आहेत.