होमपेज › Goa › सुरक्षित मासळीसाठी ‘एफडीए’ सशक्‍त करणार

सुरक्षित मासळीसाठी ‘एफडीए’ सशक्‍त करणार

Published On: Jul 24 2018 1:38AM | Last Updated: Jul 24 2018 1:38AMपणजी : प्रतिनिधी 

जनतेच्या आरोग्याची सरकारला काळजी आहे. गोमंतकीयांना सुरक्षित मासळी मिळेल, याची जबाबदारी सरकारची आहे. त्यासाठी अन्‍न व औषध प्रशासन विभाग अधिक सशक्‍त करणार, अशी ग्वाही मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सोमवारी विधानसभेत फार्मेलिनप्रश्‍नी लक्षवेधी सूचनेवेळी  दिली. 

मासळीच नव्हे तर आयात होत असलेल्या भाजी, फळे व अन्य जीवनावश्यक बाबींवरदेखील कडक लक्ष ठेवले जाईल. गोमंतकीयांच्या जीवाशी कोणालाही खेळू देणार नाही, असेही ते म्हणाले. काँग्रेस आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स व भाजप आमदार नीलेश काब्राल यांनी ही लक्षवेधी सूचना मांडली होती. 

गोवा हे पर्यटनस्थळ असल्याने मासळीला मोठी मागणी आहे. त्यामुळे  तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ आदी राज्यांतून गोव्यात मासळी आयात करावी लागते. अन्‍न  व औषध प्रशासनाकडून पणजी व मडगाव मासळी मार्केटमधील आयात मासळीची तपासणी करण्यात आली होती. मात्र, त्यात फार्मेलिनचा अंश आढळून आला नव्हता, असे पर्रीकर यांनी  सांगितले.

मुख्यमंत्री पर्रीकर म्हणाले, जुलै महिन्यात मासळी संदर्भात तक्रार आल्यानंतर पुन्हा एकदा प्रशासनाकडून  12 जुलै रोजी राज्यातील मासळी बाजारातील मासळीचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. यावेळी   मासळीत असलेले फार्मेलिनचे प्रमाण सेवन करण्यायोग्य असल्याचे आढळून आले.  मासळी, भाजी, फळे, यांच्यात फार्मेलिनचे प्रमाण हे असतेच. प्रशासनाकडून 116 नमुन्यांची  तपासणी करण्यात आली; परंतु त्यात फार्मेलिन  आढळून आले नाही.

गोव्यात आयात केल्या जाणार्‍या मासळीवर 15 दिवसांची बंदी घालण्यात आली आहे, गरज पडल्यास या बंदीत वाढ करण्यात येईल.  अन्‍न व औषध प्रशासन, पोलिस, मत्स्योद्योग खाते हे संयुक्‍तपणे मासळीची तपासणी करणार आहे. वेळ पडल्यास मडगाव येथील  घाऊक मासळी बाजार मडगावबाहेर स्थलांतरीत करण्यात येईल, असे आश्‍वासन त्यांनी दिले.

जनतेच्या मनातून फार्मेलिन संदर्भातील भीती काढून टाकण्यासाठी   मासळी आयातीवर बंदी घालण्यात आली आहे. मासळीचे 9 ट्रक परत पाठवण्यात आले आहेत. बंदी उठवल्यानंतरदेखील मासळीची नियमितपणे तपासणी केली जाईल, प्रशासन अधिक सशक्‍त करणार. यासाठी   प्रशासनाला ‘एफएसएसएआय’कडून शिफारस करण्यात आलेले स्क्रिनिंग टेस्ट किट उपलब्ध केले जातील. यामुळे फार्मेलिनची तपासणी करणे शक्य होईल, असेही  मुख्यमंत्री पर्रीकर यांनी सांगितले. 

पर्रीकर यांनी यावेळी अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाचा (एफएसएसएआय) अहवाल सादर केला. ते म्हणाले,  ‘एफएसएसएआय’ कडून फार्मेलिनयुक्त मासळी प्रकरणातील अहवाल देण्यात आला असून यासंदर्भात कुणाला काही संशय असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात कळवावे. आमदारांच्या अहवालाबाबत काही शंका ‘एफएसएसएआय’कडे पाठवून योग्य उत्तर मागविले जाईल.