Wed, Jul 24, 2019 14:11होमपेज › Goa › ‘एफडीए’च्या मासळी तपासणीत व्यत्यय  

‘एफडीए’च्या मासळी तपासणीत व्यत्यय  

Published On: Sep 10 2018 1:16AM | Last Updated: Sep 09 2018 11:32PMपणजी : प्रतिनिधी

पोळे- काणकोण येथील चेकनाक्यावर  परराज्यातील आयात होणार्‍या  मासळीची चाचणी करण्याच्या कामात  अन्न आणि औषध प्रशासनाच्या  (एफडीए)अधिकार्‍यांच्या कामात हस्तक्षेप करून अडथळा आणल्याबद्दल पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. येत्या दोन दिवसात सदर सामाजिक कार्यकर्त्याविरूद्ध आरोपपत्र दाखल केले जाणार असल्याचे ‘एफडीए’च्या सूत्रांनी सांगितले. 

परराज्यातून आयात होणार्‍या मासळीमध्ये फार्मेलिन घातक रसायन असण्याची शक्यता असल्याने राज्य सरकारने   मासळी बंदीच्या कालावधीनंतर पोळे आणि पत्रादेवी चेकनाक्यावर एफडीए अधिकार्‍यांना चाचणीसाठी नियुक्त केले होते. पोळे येथे 8 ऑगस्ट रोजी मध्यरात्री काही मीडिया पोळे चेकनाक्यावर या तपासणीचे चित्रण करत असताना स्वत:ला सामाजिक कार्यकर्ता म्हणवणार्‍या एका व्यक्तीने एफडीए च्या अधिकार्‍यांना अनेक प्रश्‍न विचारून सतावले. 

यावेळी चाचणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या  एफडीए च्या राजाराम पाटील , शिवदास नाईक व अन्य अधिकार्‍यांच्या कामात अडथळा आणला. सदर चाचणी करताना दुर्लक्षपणा आणण्यासाठीही या व्यक्तीने प्रयत्न केला होता. उपस्थित माध्यम प्रतिनिधींनाही या व्यक्तीने  माहिती देण्याचा प्रयत्न केल्याची लेखी तक्रार 8 ऑगस्ट 2018 रोजी काणकोण पोलिस स्थानकात देण्यात आली. 

पोलिसांनी सदर तक्रारची नोंद करताना अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. यासाठी मीडिया संस्थेकडून 8 ऑगस्टच्या रात्रीचे पूर्ण चित्रण ताब्यात घेण्यात आले. या चित्रफितीवरून सदर अज्ञात  व्यक्तीची ओळख पटली आहे. मडगाव येथील  ही व्यक्ती स्वत:ला सामाजिक कार्यकर्ता म्हणवणारी असून त्याच्याविरुद्ध येत्या दोन दिवसात आरोपपत्र दाखल केले जाणार असल्याचे एफडीएच्या सूत्रांनी सांगितले.