होमपेज › Goa › खाण अवलंबितांच्या कर्जफेड योजनेला मुदतवाढ : पर्रीकर

खाण अवलंबितांच्या कर्जफेड योजनेला मुदतवाढ : पर्रीकर

Published On: Jan 04 2018 1:00AM | Last Updated: Jan 03 2018 11:50PM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

खाण अवलंबितांसाठीच्या कर्जफेड योजनेला मार्च- 2018 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या योजनेत नव्या अर्जदारांचा समावेश असणार नाही. मात्र आधी अर्ज दिलेल्या व काही तांत्रिक कारणामुळे स्थगित ठेवलेल्या अर्जांचा विचार केला जाणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. 

मंत्रिमंडळ बैठक झाल्यानंतर महत्त्वाचे निर्णय पत्रकारांना सांगताना पर्रीकर म्हणाले, की राज्यात सार्वजनिक जागेत खुल्या पद्धतीने मद्यपान अथवा स्वंयपाक करण्यास दंड आकारणारा खास कायदा केला जाणार आहे. यासाठी येत्या फेब्रुवारीत अर्थसंकल्पीय अधिवेशनात पर्यटन कायद्यात दुरुस्ती केली जाणार आहे. काही पर्यटक राज्यात बसगाड्यातून येतात व उघड्यावर स्वंयपाक करतात, त्यावरही आळा घातला जाणार आहे. यासाठी राज्यात विविध ठिकाणी विशेष जागा आरक्षित केला जाणार असून तिथे स्वंयपाक करण्यासाठी पाणी, वीज, शौचालय, कचरा गोळा करणारी व्यवस्था आदी सोयी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यासाठी पर्यटकांकडून  माफक शुल्क आकारणीही केली जाणार आहे. 

तिसवाडी तालुक्यातील मेरशी येथे न्यायालयाची नवी इमारत बांधण्यासाठी गोवा साधन सुविधा महामंडळाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. मुंबई खंडपीठाच्या गोवा उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या इमारतीचे बांधकाम सरकार करणार असून त्यासाठी सुमारे 200 कोटी रुपयांचा  खर्च येणार आहे. याशिवाय, राज्यात भिकार्‍यांचा वाढता उपद्रव कमी करण्यासाठी म्हापसा येथे त्यांच्यासाठी खास आसरागृह बांधले जाणार असल्याचे मुख्यमंत्री पर्रीकर यांनी सांगितले.