Fri, Mar 22, 2019 01:28
    ब्रेकिंग    होमपेज › Goa › माजी सैनिक कल्याण संघटनेतर्फे ७ रोजी मॅरेथॉन स्पर्धा

माजी सैनिक कल्याण संघटनेतर्फे ७ रोजी मॅरेथॉन स्पर्धा

Published On: Jan 04 2018 1:00AM | Last Updated: Jan 03 2018 11:31PM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

अखिल गोवा माजी सैनिक कल्याण संघटनेतर्फे दि. 7 जानेवारी रोजी  ‘रन फॉर जवान-रन फॉर युनिटी’ या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजन समितीचे सचिव अनंत जोशी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. मॅरेथॉनची सुरुवात ब्रिगेडियर ए. के. शर्मा यांच्याहस्ते सकाळी 7  वाजता बांबोळी कुजिरा येथील अ‍ॅथलेटिक्स मैदान येथून होईल. 

अनंत जोशी म्हणाले, दि. 15 जानेवारी 1948 रोजी लेफ्टनंट जनरल के. एम. करिअप्पा यांना पहिले इंडियन कमांडर इन चिफ हे पद मिळाले होते. या दिवशी राज्यात इतरही कार्यक्रम होणार असल्याने मॅरेथॉन स्पर्धा 7 जानेवारीला घेण्यात येईल. 15 जानेवारी रोजी देशात सैन्यदिन साजरा केला जातो. या निमित्त ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मेरेथॉन 10 किलोमीटर व 5 किलोमीटर ‘ड्रिम रन’ अशी स्पर्धेची विभागणी करण्यात आली आहे. 10 कि.मी. स्पर्धेचा मार्ग बांबोळी येथील अ‍ॅथलेटिक्स स्टेडिअम ते ओशेल जंक्शन असा असेल. 5 कि.मी. स्पर्धेचा मार्ग बांबोळी येथील अ‍ॅथलेटिक्स स्टेडिअम ते ऑल इंडिया रेडिओ स्टेशन असा असेल.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 200 रुपये शुल्क आकारले जाणार असून स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. शालेय विद्यार्थी व सैनिकांसाठी ही स्पर्धा मोफत असल्याचे जोशी यांनी सांगितले. मॅरेथॉन स्पर्धेबरोबरच यावेळी टी शर्ट पेटींग स्पर्धा देखील होईल. यावेळी आयोजित आर्मी बँण्ड व झुंबा नृत्य हे खास आकर्षण असेल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धेदिवशी सकाळी नावनोंदणी करणे आवश्यक असून सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्रदिले जाईल.

राज्यातील युवकांनी व शालेय विद्यार्थ्यांना देशाच्या संरक्षण सेवेत भरती होण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, हा या रॅलीचा मुख्य उद्देश आहे. रॅलीतून जमा होणार्‍या निधीचा विनियोग लष्करातील अधिकार्‍यांच्या कुटुंबीयांसाठी, ग्रामीण भागातील शालेय मुलांचे शिक्षण, निराधार ज्येष्ठ  नागरिकांना मदत, पर्यावरण संरक्षणाबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी केला जाईल.

अखिल गोवा माजी सैनिक कल्याण संघटनेतर्फे गोवा मिलिटरी स्टेशन, रोटरी क्लब पर्वरी व इव्हेंट बास्केट यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पत्रकार परिषदेस अविनाश परमार, वैभव कळंगुटकर, गिरीश सावंत व भालचंद्र आमोणकर उपस्थित होते.