Wed, Aug 21, 2019 19:35होमपेज › Goa › वीज दरवाढ अंशतः मागे

वीज दरवाढ अंशतः मागे

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

घरगुती वीज ग्राहकांसाठी दरमहा 200 युनिटस्पर्यंत वीज वापरावरील दरवाढ सरकारने मागे घेतली आहे. 200 युनिटस्पेक्षा अधिक वीज वापरावर किरकोळ दरवाढ लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी पर्वरीत सचिवालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितले. 

राज्यातील सरसकट सर्व वीज ग्राहकांना एप्रिल महिन्यापासून वीज दरवाढ लागू करण्याच्या निर्णयावर  सर्वसामान्यांसह आमदार, मंत्र्यांकडून वीजमंत्र्यांवर टीका झाली होती. या पार्श्‍वभूमीवर वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी सोमवारी दुपारी  सचिवालयात बोलावलेल्या बैठकीत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे प्रधान सचिव व्ही. कृष्णमूर्ती, वित्त खात्याचे सचिव दौलत हवालदार, वीज खात्याचे प्रधान अभियंते रेड्डी आणि खात्याच्या अन्य अधिकार्‍यांशी चर्चा केली. 
बैठकीनंतर मडकईकर म्हणाले की, संयुक्‍त वीज नियामक मंडळाने (जेईआरसी)  विजेच्या शुल्कात  वाढ करण्याची शिफारस खात्याला केली होती. या शिफारशीनुसार सरसकट सर्वच वीज ग्राहकांना एप्रिल-2018 पासूनच्या वीज बिलात सरासरी फक्त 4.9 टक्के इतकी दरवाढ करण्यास खात्याने संमती दर्शविली होती.  मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या दरवाढीला मान्यताही घेण्यात आली होती.

मात्र, सामान्य वीज ग्राहक   तसेच काही आमदारांनीही सदर दरवाढ 11 टक्के असल्याचा दावा करून नाराजी व्यक्त केली होती. यासाठी अधिकार्‍यांच्या घेतलेल्या बैठकीत विविध पर्यायांवर चर्चा होेऊन   दरमहा 200 युनिटपर्यंत  वीज वापरावर दरवाढ लागू न करण्याचे निश्‍चित करण्यात आले. तर 200 युनिटपेक्षा अधिकच्या वीज वापरावर चालू तिमाहीत केवळ 4.09 टक्के दरवाढीची शिफारस खात्याकडून करण्यात आली आहे.मडकईकर म्हणाले की, राज्य सरकारने अर्थसंकल्पीय तरतुदीतून वीज खात्याला सुमारे 143 कोटींचे अनुदान देण्याची तयारी दाखवली होती. मात्र, जेईआरसीने गोव्यातील वीज दर अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वात कमी असल्याने दरवाढ करण्याचे सुचविले होते.  

राज्यात सुमारे 3.44 लाख वीज जोडण्या असून त्यापैकी सुमारे 75 टक्के ग्राहक हे दरमहा 200 युनिटपेक्षा कमी विजेचा वापर करतात. याच 75 टक्के ग्राहकांना या  निर्णयाचा लाभ होणार आहे. राज्यातील 10 हजार 700 मीटर्स शेतींसाठी वापरले जात असून त्यांनाही दरवाढीचा फटका बसू नये, याची काळजी घेण्यात आली आहे. राज्यातील सुमारे 3.44 लाख वीज जोडण्यांपैकी सुमारे  70 हजार मीटर नादुरुस्त अथवा बंद अवस्थेत  असल्याने खात्याच्या महसुलात तूट दाखवली जाते. हे नादुरूस्त मीटर बदलण्याचे काम येत्या दोन वर्षात पूर्ण होईल,त्यानंतर वीज खाते   नफ्यात येईल असे, मडकईकर यांनी सांगितले. 

Tags : Goa, Goa News, Electricity, tariff,  household, power, customers,  200 units, per month, withdrawn


  •