Fri, May 24, 2019 20:31होमपेज › Goa › वीज दरवाढीचा ‘झटका’

वीज दरवाढीचा ‘झटका’

Published On: Feb 06 2018 1:44AM | Last Updated: Feb 06 2018 12:21AMपणजी : प्रतिनिधी

राज्यातील वीज ग्राहकांना पुन्हा एकदा शुल्कवाढीचा ‘शॉक’  लागणार असून फेब्रुवारी ते एप्रिल या तीन महिन्यांचे बिल सुमारे 13 ते 15 टक्के वाढीव दराने  मिळणार आहे. घरगुती आणि औद्योगिक अशा दोन्ही विभागांतील ग्राहकांना ही दरवाढ लागू राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

केंद्राच्या ‘इंधन व वीज खरेदी किंमत समायोजना’नुसार (एफपीपीसीए) राज्याकडून वीज खरेदीसाठी लागणार्‍या खर्चाचा भार दर सहा महिन्यांनी ग्राहकांकडून वसूल केला जातो. ‘एफपीपीसीए’च्या दरात घट झाली तर या घटलेल्या दराचा लाभही ग्राहकांना पुढील बिलात  परतावा म्हणून दिला जातो, अशी माहिती वीज खात्याच्या अधिकार्‍यांनी दिली. संयुक्‍त वीज नियामक आयोगाच्या (जेईआरसी) संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, मागील वर्षाच्या शेवटच्या तीन महिन्यांसाठी ‘एफपीपीसीए’च्या दरात झालेली वाढ यंदाच्या वर्षी पहिल्या तीन महिन्यांच्या बिलात  लागू केली जाणार आहे. यामुळे जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यांच्या विजेच्या वापरावर दरवाढ  होणार आहे.  या तीन महिन्यांचे बिल अनुक्रमे फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलमध्ये ग्राहकांच्या हाती पडणार आहे. या बिलांत 13 ते 15 टक्के अधिक शुल्क आकारले जाणार असून त्यामुळे प्रति युनिट 4 पैसे ते 23 पैसे अधिक भुर्दंड ग्राहकांना सोसावा लागणार असल्याचे खात्याच्या सूत्रांनी सांगितले.