Tue, Apr 23, 2019 18:22होमपेज › Goa › राज्यात रमजान ईद उत्साहात

राज्यात रमजान ईद उत्साहात

Published On: Jun 17 2018 1:35AM | Last Updated: Jun 17 2018 12:05AMमडगाव : प्रतिनिधी 

मुसलमान बांधवांचा ईद उल फित्र म्हणजेच रमजान ईद हा सण  रमजानचा पवित्र महिना संपल्यावर शनिवारी राज्यात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.  शाळांना सुट्टी असल्याने मुलांनीही घरोघरी ईदच्या शुभेच्छा देताना सणाचा आनंद लुटला. मुस्लिम बांधवांच्या उत्साहात अनेक मंत्री, आमदारांनीही सहभागी होऊन सर्वांना  शुभेच्छा दिल्या. 

जामा  मशिदीसह अन्य सर्व मशिदीत सकाळी 7 वाजल्यापासून नमाज पठण सुरू झाले होते.  सासष्टीत काही ठिकाणी नमाज पठणानंतर   बांधवांनी एकमेकांना आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. स्त्रिया व मुलांनीही एकमेकांच्या घरी जाऊन ईदच्या शुभेच्छांचे आदानप्रदान केले.   राज्यात विविध ठिकाणी ईद निमित्ताने मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत मुस्लिम बांधवांसह अन्य नागरिक यावेळी सहभागी झाले होते. 

अखिल भारतीय हज समितीचे उपाध्यक्ष तथा गोवा हज समितीचे अध्यक्ष शेख जिना म्हणाले की, संपूर्ण राज्यात ईद मोठ्या आनंदात साजरी  झाली. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे रमजानच्या  पवित्र महिन्यात गोव्यात आगमन झाले असून त्यांनी आम्हा सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच  केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या. सकाळी दक्षिण गोव्याचे खासदार अ‍ॅड. नरेंद्र सावईकर यांनी   रूमडामळ दवर्ली येथे भेट देऊन ईद सण साजरा केला. 

नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई, मत्स्योद्योग मंत्री विनोद पालयेकर, मंत्री जयेश साळगावकर    यांनीही ईदच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत.