Thu, Jul 18, 2019 10:18होमपेज › Goa › खा. विनय तेंडुलकर यांच्याविरुद्ध तक्रार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चोडणकर धमकी प्रकरण

खा. विनय तेंडुलकर यांच्याविरुद्ध तक्रार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चोडणकर धमकी प्रकरण

Published On: Jun 30 2018 1:15AM | Last Updated: Jun 30 2018 12:33AMपणजी (प्रतिनिधी) ः भाजप  प्रदेशाध्यक्ष तथा  राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांच्या विरोधात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांना धमकी दिल्याची तक्रार प्रदेश काँग्रेसतर्फे शुक्रवारी पणजी पोलिस स्थानकात  दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी तेंडुलकर यांच्याविरोधात त्वरित एफआयआर नोंदवावा, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. तेंडुलकर व इतरांविरोधात पणजी काँग्रेस गटाध्यक्ष प्रसाद आमोणकर यांनी ही तक्रार दाखल केली आहे.   

काही वर्षांपूर्वी  विधानसभेबाहेर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष  अ‍ॅड. शांताराम नाईक यांच्यावर जसा जमावाने हल्‍ला केला होता, त्याच पद्धतीने चोडणकर यांच्यावरही हल्‍ला  होईल, अशी धमकी तेंडुलकर यांनी दिल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पणजी येथे इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रांगाझा सभागृहात 26 जून रोजी भाजपचे  राष्ट्रीय सरचिटणीस  मुरलीधर राव यांची सभा होती. यावेळी केंद्रीय आयुषमंत्री  श्रीपाद नाईक, दक्षिण गोवा खासदार नरेंद्र सावईकर व अन्य पदाधिकारी तसेच नागरिकही उपस्थित होते. त्यावेळी तेंडुलकर यांनी आपल्या भाषणावेळी ही धमकी दिली. या भाषणाचे प्रक्षेपण  विविध वृत्त वाहिन्यांवरून झाले असून त्याची सीडीही तक्रारीसोबत जोडण्यात आल्याचे आमोणकर यांनी तक्रारीत नमूद केले आहे.