होमपेज › Goa › विधानसभा हिवाळी अधिवेशन चार दिवसांचे; कामकाज २० तासांचे

विधानसभा हिवाळी अधिवेशन चार दिवसांचे; कामकाज २० तासांचे

Published On: Dec 21 2017 1:54AM | Last Updated: Dec 20 2017 11:48PM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

राज्य विधानसभा हिवाळी अधिवेशनातील चार दिवसांत 20 तास 10 मिनिटांचे कामकाज झाले. अधिवेशनात 242 तारांकीत आणि 461 अतारांकीत असे एकूण 703 प्रश्‍न विचारण्यात आले. यातील 75 टक्के प्रश्‍न ऑनलाईन पध्दतीने विचारण्यात आले. एकूण 21 शोक प्रस्ताव, 7 अभिनंदन ठराव, 5 लक्ष्यवेधी सूचना, 24 शून्यकाळाचे प्रस्ताव व 4 खासगी प्रस्ताव सादर झाल्याची माहिती सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी (दि.18) अधिवेशनाच्या समारोपावेळी दिली.

सभापती सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिवेशनात पाच सरकारी विधेयकांवरील दुरूस्तीवर चर्चा होऊन ते संमत करण्यात आले.  कोळसा प्रदूषण आणि नद्यांच्या राष्ट्रीयीकरणासंबंधी सदस्यांमध्ये गहन चर्चा झाली. या चर्चेवेळी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सर्व शंकाचे समाधान केल्याचे सभापती सावंत यांनी नमूद केले.

गोवा मुक्‍तीदिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील सर्व स्वातंत्र्यसैनिकांची नावे नमूद करणारी पुस्तिका सरकारने प्रसिध्द केली आहे. यात स्वातंत्र्यसैनिक बाळा म्हापारींसह सर्व स्वातंत्र्यसैनिकांचा समावेश  केल्याची माहिती सभापती सावंत यांनी दिली. 

अर्थसंकल्पीय अधिवेशन 15 फेब्रुवारीपासून 

राज्याचे पुढील वर्षाचे अर्थसंकल्पीय  अधिवेशन दि. 15 फेब्रुवारी 2018 पासून सुरू होण्याची शक्यता असल्याचे सभापती प्रमोद सावंत यांनी सांगितले.