Wed, Jul 24, 2019 05:43होमपेज › Goa ›  म्हादई संपदा रक्षा यात्रेच्या दबावामुळेच कर्नाटक नमले

 म्हादई संपदा रक्षा यात्रेच्या दबावामुळेच कर्नाटक नमले

Published On: Jan 31 2018 12:16AM | Last Updated: Jan 30 2018 11:52PMपणजी : प्रतिनिधी

म्हादई नदीचे पाणी  कर्नाटकाकडे वळवण्याचा प्रयत्न   सुरू असल्याचे राज्य सरकारनेही आता मान्य केले आहे.  गोवा सुरक्षा मंचतर्फे सुरू करण्यात आलेल्या म्हादई संपदा रक्षा यात्रेच्या दबावामुळे कर्नाटकानेही मातीचा बांध  मोडून कणकुंबीतील परिस्थिती पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला, असे गोवा सुरक्षा मंचचे संघटन सरचिटणीस आत्माराम गावकर यांनी सांगितले. 

गोसुमंतर्फे आयोजित करण्यात आलेल्या म्हादई संपदा रक्षा यात्रेचा मंगळवारी  पणजीत समारोप करण्यात आला. येथील जुन्या सचिवालयापासून पणजी शहरातून यात्रा काढल्यानंतर आझाद मैदानावर संध्याकाळी 5.30 वाजता सभा घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. 

राज्यभरात सुमारे  175 कि.मी.चा प्रवास करून आलेल्या म्हादई संपदा रक्षा यात्रेचा पणजीत मंगळवारी समारोप करण्यात आला. विविध 10 ठिकाणावरील जलस्त्रोताचे पाणी एका कलशात घालून त्याचे सुर्ल-बाराजण गावात विधिवत पूजन करण्यात आले आहे. कर्नाटकसह गोवा सरकारवरही या यात्रेच्या जनजागृतीमुळे दबाव आला आहे. यामुळेच सभापती प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली एक पथकाने  केलेल्या पाहणीत म्हादई नदीचे पात्र कर्नाटकाने अडवल्याचे सावंत यांनी मान्य केले. म्हादई नदीचे पात्र पूर्ववत जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमचा लढा कायम राहणार आहे,असे गावकर यांनी सांगितले.
म्हादई नदीवर अतिक्रमण करणार्‍या कर्नाटक राज्याविरोधात जनसमूहाला संघटित करण्यासाठी गोवा सुरक्षा मंचतर्फे सुरू करण्यात आलेल्या म्हादई संपदा रक्षा यात्रेचा मंगळवारी पणजीत समारोप करण्यात आला. या यात्रेमध्ये   सुमारे 40 हजार लोकांनी सहभाग घेतल्याची माहिती  गणेश गावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

पाणी वाटपाबाबत गेली अनेक वर्षे कर्नाटक आणि गोव्यामध्ये वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कर्नाटकाचे भाजप प्रदेशाध्यक्ष येडियुरप्पा यांना लिहलेल्या पत्रामुळे या वादात  तेल पडले आहे.आपल्या भाजप पक्षाच्या राजकारणासाठी पर्रीकर यांनी म्हादईच्या हिताची तिलांजली दिली असून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची गरज असल्याचे मत गोसुमंचे अध्यक्ष आनंद शिरोडकर यांनी सांगितले.