Thu, Jun 20, 2019 14:40होमपेज › Goa › एफडीएच्या दिरंगाईमुळे मासळी निर्यातीवर परिणाम

एफडीएच्या दिरंगाईमुळे मासळी निर्यातीवर परिणाम

Published On: Aug 06 2018 1:51AM | Last Updated: Aug 06 2018 1:51AMमडगाव : प्रतिनिधी 

अन्न आणि औषध प्रशासनाच्या अपुर्‍या कर्मचारीवर्गामुळे आणि उशिराने तपासणी करण्याच्या धोरणाचा फटका विदेशात निर्यात होणार्‍या मासळीच्या व्यवसायाला बसू लागला असून निर्यातदारांवर कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीला तोंड देण्याची  वेळ आली आहे. परराज्यातून मासळी घेऊन गोव्यात दाखल होणार्‍या वाहनांची तपासणी करण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत, पण अन्न आणि औषध प्रशासनाकडून  दुपारी तीन ते मध्यरात्री बारापर्यंत येणार्‍या मासळीची तपासणी सकाळी होऊ लागल्याने निर्यातीसाठी आलेली मासळी 7 ते 8 तास नाक्यावर अडकून पडू लागली आहे.

मडगावच्या घाऊक मासळी बाजाराचे अध्यक्ष आणि बीएम फिशरीजचे मालक मौलाना इब्राहिम यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले की, आपण याबाबत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना पत्र पाठवून वस्तुस्थिती मांडली आहे. फार्मेलिनचा विषय समोर आल्यापासून गोव्यातील मासळी व्यवसायाला उतरती कळा लागली आहे.

परराज्यातून येणार्‍या मासळीवरील बंदी 3 ऑगस्ट रोजी उठली. त्यानंतर मासळी घेऊन येणार्‍या वाहनांची तपासणी चेकनाक्यावर केली जावी, असे आदेश मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिले होते. आपण लोकांच्या खाण्यातील मासळीवर लक्ष केंद्रित केले असून लोकांच्या जेवणात जाणारी मासळी तपासली जावी, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. पण प्राप्त माहितीनुसार सध्या सुक्याबरोबर ओलेही जळू लागले आहे. विदेशात निर्यात करण्यासाठी केरळ, कर्नाटक, ओडिशा, तामिळनाडू आदी राज्यांतून मोठी आणि महागडी मासळी घेऊन येणारे ट्रक इतर मासळीबरोबर नाक्यावर अडवून ठेवण्यात येऊ लागल्याने  ही मासळी खराब होण्याचे प्रकार घडू लागले आहेत.

मौलाना इब्राहिम म्हणाले की, मुख्यमंत्री पर्रीकर यांनी निर्यात होणारी मासळी तपासण्याबाबत कोणतेही आदेश दिलेले नाहीत. तरीही अन्न आणि औषध प्रशासन निर्यात होणार्‍या मासळीचे ट्रक अडवून ठेवू लागले आहेत. शनिवारी रात्री पंचवीस ट्रक दाखल झाले होते, त्यातील पाच ट्रक मासळी निर्यातीसाठी आणण्यात आली होती. रात्री बारा ते पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान हे ट्रक चेकनाक्यावर पोचले होते पण तपासणीच्या नावाखाली सकाळी अन्न आणि औषध प्राधिकरणाचे अधिकारी येईपर्यंत ट्रक तसेच नाक्यावर अडवून ठेवण्यात आले. इब्राहिम यांनी दिलेल्या माहितीनुसार निर्यात होणार्‍या मासळीवर ताबडतोब प्रक्रिया करून ती फ्रीज करून ठेवावी लागते.पण मासळी आठ तास नाक्यावर तशीच अडकून पडल्याने ती निर्यात होण्याच्या लायकीची राहिलेली नाही. याबाबत आम्ही मुख्यमंत्री पर्रीकर यांना पत्र पाठवून 24 तास अधिकारी नेमण्याची मागणी केली आहे. निर्यातीसाठी आलेली मासळी या तपासणीतून वगळण्यात यावी. ही मासळी निर्यात करणार्‍या प्रकल्पात जाते, की घाऊक मासळी बाजारात नेली जाते, यावर सरकारने नजर ठेवावी, असे इब्राहिम म्हणाले.

केरळमधून मासळी घेऊन सुटलेला ट्रक कोणत्या वेळी गोव्यात पोहचणार, हे कसे समजू शकते. दुपारी तीन वाजता आलेली मासळी रात्री बारा पर्यंत नाक्यावर पोहचल्यास तिला प्रवेश दिला जात नाही. अन्न आणि औषध प्रशासनाकडे कर्मचारी नसल्याने त्यांनी रात्री उशिरा मासळीची तपासणी होणार नाही, असे स्पष्ट केले आहे. सर्व निर्यातदारांनी आता मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना पत्र  पाठवून यावर उपाय काढण्याची मागणी केली आहे, असे  इब्राहिम यांनी सांगितले. अन्न आणि औषध प्रशासनाच्या संचालिका ज्योती सरदेसाई यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन न उचलल्याने संपर्क होऊ शकला नाही.

घाऊक मासळी बाजार पूर्ववत

आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूमधून 20 ट्रक मासळी  रविवारी सकाळी माडेल येथील घाऊक मासळी बाजारात दाखल झाले.त्यामुळे घाऊक मासळी बाजार पूर्ववत सुरू झाला. रविवारी दाखल झालेल्या मासळीचा हातोहात लिलाव झाल्याने मासळी विक्रेते आणि दलालांमध्ये उत्साहाचे वातावरण  पसरले असून दक्षिण गोव्यातील बाजारपेठांत मासळी पोचल्याने ग्राहकांची लगबग रविवारी वाढली होती.