Mon, Nov 19, 2018 02:05होमपेज › Goa › सत्तरीत कुंभारवाड्यावर पिण्याच्या पाण्याची टंचाई

सत्तरीत कुंभारवाड्यावर पिण्याच्या पाण्याची टंचाई

Published On: Apr 14 2018 1:43AM | Last Updated: Apr 13 2018 10:17PMवाळपई : प्रतिनिधी

गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची सोय करणारी गावातील विहीर बुजल्याने पाण्याचा साठा आता कमी झाला आहे. यामुळे गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे या भागात पूर्णवेळ पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी शुक्रवारी पिसुर्ले ग्रामपंचायतीच्या कुंभारखण  कुंभारवाडा भागातील नागरिकांनी वाळपईच्या पाणीपुरवठा अधिकार्‍यांची भेट घेऊन  गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली.

पंचायत सदस्य सगुण वाडकर यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी पाणीपुरवठा खात्याचे साहायक अभियंता एकनाथ पास्ते यांची भेट घेतली. तसेच त्यांना निर्माण झालेली समस्याची माहिती दिली. नागरिकांनी सांगितले, की गावातील घरापासून शंभर मीटर अंतरावर जलवाहिनी टाकण्यात आली आहे. या  ठिकाणी बंद करण्यात आलेली जलवाहिनी 100 मीटर आणखीन वाढविल्यास गावात पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी  सुटणार आहे. त्यादृष्टीने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली. 

गेल्या अनेक वर्षांपासून गावामध्ये खोदलेल्या विहिरीमधून नागरिक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करीत होते. मात्र, कालांतराने सदर विहिरीमधील  पाण्याचा साठा कमी झाल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. याबाबत अधिकार्‍यांनी लक्ष देण्याचे आश्‍वासन दिले. कायमस्वरूपी पाणीपुरवठा उपलब्ध होईपर्यंत संबंधित नागरिकांना टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येईल. नागरिकांना कोणत्याही प्रकारची पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होणार नाही याबाबत आपण गांभीर्याने लक्ष देणार असल्याचे आश्‍वासन यावेळी त्यांनी दिले.पंचायत सदस्य सगुण वाडकर यांनी सांगितले, की गावातील नागरिक कष्टकरी असून पाण्याच्या समस्यांमुळे त्यांना आपला कामधंदा सोडून पाण्याची व्यवस्था करण्यासाठी वेळ घालवावा लागत आहे. यामुळे त्यांच्या दैनंदिन कामधंद्यावर मोठा परिणाम होत आहे. याबाबत गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

Tags : Goa, Drinking, water, scarcity,  Kumbharwada