Tue, Jul 23, 2019 02:01होमपेज › Goa › कर्नाटकला पेयजलप्रश्‍नी द्विपक्षीय चर्चेची तयारी 

कर्नाटकला पेयजलप्रश्‍नी द्विपक्षीय चर्चेची तयारी 

Published On: Dec 22 2017 1:26AM | Last Updated: Dec 21 2017 11:29PM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

उत्तर कर्नाटकाच्या दुष्काळी भागातील लोकांसाठी मानवतेच्या दृष्टिकोनातून फक्त पिण्याच्या पाण्याचा वाजवी पुरवठा करण्यासाठी द्विपक्षीय चर्चा करण्याची गोवा सरकारची तत्त्वत: तयारी आहे. आम्ही कोणताच निर्णय  अद्याप घेतलेला नाही पण कर्नाटकच्या विनंतीविषयी सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यासंबंधी गोवा सरकारतर्फे चर्चेची तयारी दर्शवली असल्याचे  मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गुरूवारी सांगितले. याबाबत कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांना पत्राद्वारे कळविले आहे, असेही ते म्हणाले.

गोवा व कर्नाटक राज्यांमध्ये वादाचा विषय बनलेल्या म्हादई नदीच्या पाणी वाटपाबाबत तोडगा काढण्यासाठी बुधवारी दिल्लीत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी बैठक घेऊन मध्यस्थी केली होती. पर्रीकर यांनी गुरूवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या बैठकीबाबत सविस्तर माहिती पत्रकारांना दिली. 

पर्रीकर म्हणाले की, पूर्वनियोजितरीत्या ही बैठक ठरवण्यात आली असून या बैठकीला शहा यांच्यासह कर्नाटकाचे भाजप प्रभारी तथा केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल, पर्यावरण व वन मंत्री प्रकाश जावडेकर , अनंत कुमार, खासदार प्रल्हाद जोशी हे  उपस्थित  होते. या बैठकीत येडियुरप्पा यांनी आपल्याला लेखी पत्रही सादर केले. या पत्रातून उत्तर कर्नाटकातील दुष्काळी भागातील जनतेला पिण्याचे पाणी मिळावे या हेतूने म्हादई नदीतील 7.56 टीएमसी पाणी मलप्रभा नदीत वळवू द्यावे, अशी मागणी केली होती. मानवी जीवनासाठी पाणी ही आत्यंतिक गरजेची बाब असल्याचे लक्षात घेऊन केवळ मानवतेच्या दृष्टीने चर्चा करण्याची विनंती गोवा सरकार तत्वत: मान्य करत असून आम्ही, पाणी देतो असे सांगितलेले नाही. उत्तर कर्नाटकातील केवळ दुष्काळी प्रदेशासाठी आणि पिण्यासाठी पाणी देण्याची आमची तयारी असली तरी हे पाणी कशा तर्‍हेने आणि किती प्रमाणात द्यावे, यावर पुढील द्विपक्षीय बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. म्हादई नदीचे पाणी वळवण्यासंदर्भातील वाद राष्ट्रीय जलतंटा लवादासमोर प्रलंबित असून कर्नाटकाने केलेल्या या मागणीमुळे लवादासमोर गोव्याच्या भूमिकेला कसलाही धक्का पोहोचणार नाही, याची काळजी कर्नाटकाने घेतली पाहिजे.