Fri, May 24, 2019 07:17होमपेज › Goa › जीवन स्वर्ग बनवण्यास मनाचा पासवर्ड हवा : डॉ. बर्वे

जीवन स्वर्ग बनवण्यास मनाचा पासवर्ड हवा : डॉ. बर्वे

Published On: Feb 11 2018 12:54AM | Last Updated: Feb 10 2018 11:25PMम्हापसा  :  प्रतिनिधी

आपल्या जीवनाचा स्वर्ग बनवायचा, की नरक हे मनच  ठरवू शकते. मनातील सकारात्मक भावना जागृत झाल्यास जीवनाचा स्वर्ग होऊ शकतो तर नकारात्मक भावनेने  नरक    होऊ शकतो. जीवन स्वर्ग बनवण्यासाठी मनाचा पासवर्ड तयार करा, असे डॉ. राजेंद्र बर्वे यांनी मंथन व्याख्यानमालेतील  शनिवारी पहिल्या  व्याख्यानात सांगितले.

येथील हनुमान नाट्यगृहात लोकमित्र मंडळ आयोजित 8 व्या मंथन व्याख्यानमालेत ‘मनाचिया गुंंती’ या विषयावर डॉ.राजेंद्र बर्वे बोलत होते.यावेळी व्यासपीठावर लोकमित्रचे अध्यक्ष प्रशांत बर्वे, गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा.अनिल सामंत, महारूद्र संस्थानाचे अध्यक्ष  अमर कवळेकर व लोकमित्र मंडळाचे उपाध्यक्ष विजय तिनईकर उपस्थित होते.

बर्वे पुढे म्हणाले की, आपणातच स्वर्ग आणि नरक आहे. एखाद्या संकटात  किंवा अडचणीत सापडलो,की आपण पासवर्ड वापरून योग्य निर्णय घेऊ शकतो. कोणत्याही तणावाला न घाबरता तो सोडवायचा प्रयत्न करा. मनाच्या शक्‍तींचे असेच आहे. वापरा किंवा सोडून द्या, झगडा किंवा पळा (फाईट किंवा फ्लाईट) ते जमलं नाही तर अनावश्यक (फ्राईट) भीती निर्माण होते. महाभारतात अर्जुनासमोर अशीच  वेळ आली. आपल्याच बांधवांशी लढावे, की पळून जावे या संभ्रमात पडल्यावर तो घाबरला. गर्भगळीत झाला. धनुष्यबाणसुद्धा खाली पडले. परंतु भगवान श्रीकृष्णांनी गीतेच्या रूपाने त्यांचे मन जागृत  केले. माणसाचे मन भीतीमुळे  तणावग्रस्त  असते. त्याला शिथिल करण्यासाठी विश्रांतीची गरज आहे.

अस्थिर वृत्ती, चंचल स्वभाव, उतावीळपणा यामुळे मानासिक तणाव वाढतो. आजची पिढी इन्स्टंट कॉफीसारखी झाली आहे. साईबांबाची श्रद्धा व सबुरी या कामी उपयोगी पडते.  श्रद्धा ठेवा  आणि सबुरीने वागा, यश आपलेच होईल. विश्वासाने जगलो तर आपण तणावावर मात करू शकतो. आपण कोण आहोत हेच जाणून घ्यायला हवे. ‘कोहमं’ हे न  समजल्याने  हे तणाव येतात. हजारो वर्षांपासून हीच अवस्था आहे, म्हणूनच योगाची निर्मिती झाली.

तणावावेळी थांबा, स्थिर व्हा. दीर्घ श्‍वसन करा. मेंदूमध्ये पहिले विचार श्वासाचे असतात, ध्यान करा. रोज 20 मिनिटे स्वस्थ  बसून  श्वासावर लक्ष ठेवा, आठ सप्ताहांत मन स्थिर होईल, असेही ते म्हणाले. 

दिव्या बर्वे हिने ईशस्तवन केले. स्वागत प्रा.वल्लभ केळकर यांनी केले. प्रा.अनिल सामंत यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन वृंदा मोये यांनी केले.  विजय तिनईकर यांनी आभार मानले.