Wed, Jul 17, 2019 16:31होमपेज › Goa › पर्वरीत उभारणार डॉ. आंबेडकर भवन

पर्वरीत उभारणार डॉ. आंबेडकर भवन

Published On: Apr 15 2018 1:34AM | Last Updated: Apr 14 2018 11:43PMपणजी : प्रतिनिधी  

राज्यातील भाजप सरकारने  डॉ. आंबेडकर भवन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पर्वरी येथील  हाऊसिंग बोर्ड येथे समाज कल्याण खात्यातर्फे 4 हजार चौ. मी. जागेत आंबेडकर भवन उभारण्यात येईल, अशी घोषणा समाजकल्याण व वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त  आंबेडकर उद्यानात आयोजित शासकीय कार्यक्रमात केली.   

जनार्दन आमोणकर, डॉ. प्रेमानंद आजगावकर, बाबुराव पार्सेकर, रामदास मोरगावकर, अन्नपूर्णा नाईक यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शालांत परीक्षेत उत्कृष्ट गुण प्राप्‍त केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांनी  गौरव  केला.
मडकईकर म्हणाले की,  देशासाठी डॉ. आंबेडकर यांचे फार मोठे कार्य  आहे. त्यांच्या कार्याचा समाजाला  विसर पडता कामा नये. समाजाला पुढे नेण्यासाठी डॉ. आंबेडकर यांचे महत्त्वाचे योगदान आहे. देशातील  सर्व घटकांना एकत्र घेऊन पुढे जाण्यासाठी समतोल राखला जावा यासाठी आरक्षणाचा कायदा झाला. समाज कल्याण खात्यातर्फे  देण्यात येणार्‍या  दलित मित्र पुरस्काराची रक्‍कम   पुढील वर्षापासून 50  हजार रुपये केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

मंत्री मनोहर आजगावकर म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली शिकवण सर्वांनी आत्मसात केली पाहिजे. दलित समाजाला या देेशात त्यांचे हक्‍क मिळवून देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महामानव आहेत. त्यांनी देशासाठी केलेले  योगदान बहुमूल्य आहे. व्यासपीठावर सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर,  मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा,  इतर मागासवर्गीय आर्थिक व विकास कॉर्पोरेशन अध्यक्ष अनिल होबळे, समाज कल्याण खात्याचे संचालक एस. व्ही. नाईक आदी उपस्थित होते. 

Tags : Goa, Dr, Ambedkar, Bhavan, Build, up,  Parvari