Sun, Oct 20, 2019 02:30होमपेज › Goa › शाळा प्रवेशासाठी देणगी, शुल्क आकारणीवर निर्बंध 

शाळा प्रवेशासाठी देणगी, शुल्क आकारणीवर निर्बंध 

Published On: Jan 26 2018 1:21AM | Last Updated: Jan 26 2018 1:21AMपणजी : प्रतिनिधी

विद्यालयापासून जवळच्या अंतरातील विद्यार्थ्यांना प्रवेशात प्राधान्य देणे, वाढीव शुल्क आकारणी न करणे, देणग्यांसाठी पालकांवर दबाव न टाकणे या निर्देशांचे सक्तीने पालन करण्याचे आदेश राज्यातील  सर्व अनुदानित आणि विनाअनुदानित विद्यालयांना देण्यात आले असून  या संबंधीचे परिपत्रक गुरूवारी जारी केल्याचे शिक्षण संचालक गजानन भट यांनी सांगितले. येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील प्रवेशासाठी हे  निर्बंध लागू होणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. 

शिक्षण संचालनालयाने जारी केलेल्या परिपत्रकात ‘शिक्षण हक्क कायदा-2009’ अंतर्गत शाळा व विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत कोणत्याही बेकायदेशीर  कृत्यास मनाई करण्यात आली आहे. सदर परिपत्रक राज्यातील सर्व शाळांच्या व्यवस्थापन तसेच मुख्याध्यापकांना पाठवण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. 

राज्यातील अनेक नामांकित शाळांमध्ये शिशुवर्ग, पहिली अथवा पाचवीच्या प्रवेशासाठी काही शाळा व्यवस्थापनाकडून मोठ्या देणग्या मागितल्या जात असल्याच्या अनेक तक्रारी खात्याकडे आल्या आहेत. शाळेची नवी इमारत, सभागृह अथवा वर्गवाढीचे बांधकाम आदी कारणांसाठी सदर देणग्या घेतल्या जातात. कोणत्याही प्रकारे देणग्या घेण्याचा प्रकार उघडकीस आल्यावर संबंधित शाळेवर कडक कारवाई करण्याचा इशारा परिपत्रकान्वये देण्यात आला आहे.  

शहरामधल्या शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी नेहमीच झुंबड उडालेली असते. त्यात शाळेपासून जवळच्या अंतरावर वास्तव्य करणार्‍या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जातो. यासाठी प्राथमिक शाळेच्या 0 ते 1 कि.मी., माध्यमिक शाळेच्या 0 ते 3 कि.मी. आणि उच्च माध्यमिक शाळेच्या 0 ते 5 कि.मी. अंतरातील विद्यार्थ्यांना संबंधित शाळांनी प्रवेशाबाबत प्राधान्य द्यावे, असे खात्याने बजावले आहे. 

विद्यालय व्यवस्थापनाने कोणतेही बेकायदेशीर कृत्य करताना सापडल्यास संबंधित विद्यालयाचे  अनुदानही बंद करण्याचा इशारा शिक्षण संचालनालयाने परिपत्रकाद्वारे दिला आहे. सर्व सरकारी तसेच अनुदानित विद्यालयांना हे निर्बंध लागू होणार आहेत, असे भट यांनी सांगितले.

देणगी घेतल्यास दहापट दंड

शाळा व्यवस्थापनाने बेकायदेशीररीत्या देणग्या घेतल्याचे सिद्ध झाल्यास देणगीच्या दहापट दंड आकारला जाणार आहे. मुलाची अथवा पालकाची प्रवेशावेळी चाचणी घेतल्याचे आढळल्यास पहिल्या अपराधाला किमान 25 हजार रूपये दंड आणि दुसर्‍यांदा असाच अपराध केल्यास दंडाची रक्कम 50 हजार रुपयांपर्यंत वाढणार असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.