Thu, May 23, 2019 14:33
    ब्रेकिंग    होमपेज › Goa › नवजात अर्भक बळकावण्याचा डॉक्टरचा डाव फसला

नवजात अर्भक बळकावण्याचा डॉक्टरचा डाव फसला

Published On: Jun 16 2018 1:29AM | Last Updated: Jun 15 2018 11:59PMमडगाव : प्रतिनिधी 

नवजात जुळ्या मुलींपैकी एक  मुलगी मृत असल्याचे सांगून परस्पर ती मुलगी आपल्याजवळ ठेवू पाहणार्‍या मडगावातील एका प्रतिष्ठित डॉक्टरचे मनसुबे सदर मुलींच्या आईने सतर्कतेने उधळून लावले. मडगावातील एका खासगी इस्पितळात गुरुवारी हा प्रकार घडला असून, प्रकरण अंगलट येणार या भीतीने सदर डॉक्टरला ते अर्भक  आईच्या स्वाधीन करावे लागले आहे. प्राप्त माहितीनुसार इस्पितळाच्या परिचारिकेकडून त्या महिलेला जबर मारहाणदेखील झाली आहे. मात्र, याविषयी पोलिस ठाण्यात तक्रार नोंद झालेली नाही.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दक्षिण गोव्यातील एका सामान्य कुटुंबातील महिला प्रसूतीसाठी मडगावात प्रतिष्ठित समजल्या जाणार्‍या डॉक्टरच्या इस्पितळात भरती झाली होती. त्यापूर्वी गरोदरपणाच्या काळातील तपासणीत तिला जुळे अपत्य होणार असल्याचे सांगण्यात आले होते. बुधवारी तिची प्रसूती झाली; पण शुद्धीवर येताच तिच्यासमोर एकच मुलगी आणून ठेवण्यात आली. तिने आणि तिच्या पतीने आपले  दुसरे बाळ कुठे आहे, अशी विचारणा केली असता ते मूल जन्माला येताच मरण पावल्याचे तिला सांगण्यात आले. तपासणीच्यावेळीदोन्ही मुले सुदृढ असल्याचे आपल्याला सांगण्यात आले होते, मग असे कसे झाले, अशी विचारणा तिने केली असता परिचारिकेकडून तिला समाधानकारक उत्तरे मिळू शकली नाही. त्यामुळे तिने आणि तिच्या पतीने पोलिस स्थानकात जाण्याची धमकी दिली. बर्‍याच वादविवादानंतर तिला तिचे दुसरे मूल परत देण्यात आले.

या वादात एका परिचारिकेने प्रसूती झालेल्या महिलेच्या पोटावर लाथ मारल्याने तिला बर्‍याच प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला होता. हे प्रकरण आपल्या अंगावर शेकणार असे दिसू लागल्याने अखेर या इस्पितळाच्या डॉक्टरने तिचे मूल तिला देऊन टाकले.पीडित महिलेच्या नातेवाईकांनी ‘पुढारी’शी बोलताना तिची त्याच दिवशी प्रसूती झाली होती आणि परिचारिकेने तिला लाथ मारल्याने अतिरक्तस्त्राव झाला होता. तिची तब्येत जास्त बिघडू लागल्याने तिला मडगावातील दुसर्‍या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरकडून उशिराने देण्यात आलेल्या तिच्या दुसर्‍या मुलीची तब्येत बिघडली असून तिलाही अन्य खासगी इस्पितळात भरती करण्यात आले आहे. मूल मृत झाल्याचे सांगून काही डॉक्टर मुलांना विकण्याचा व्यवसाय करत आहेत, असा संशय पीडित महिलेच्या   नातलगांनी व्यक्त केला आहे.प्राप्त माहितीनुसार हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोचले होते. दोन्ही पक्षांना पोलिस स्थानकात बोलावण्यातही आले होते. पण एका अतिमहनिय व्यक्तीच्या मध्यस्थीमुळे पोलिसांत तक्रारीची नोंद झाली नसल्याचे समजते.