Fri, May 24, 2019 08:27होमपेज › Goa › समुद्रात 30 मे पर्यंत उतरू नये ; वेधशाळेचा इशारा

समुद्रात 30 मे पर्यंत उतरू नये ; वेधशाळेचा इशारा

Published On: May 29 2018 1:42AM | Last Updated: May 28 2018 11:02PMपणजी : प्रतिनिधी

कर्नाटक, केरळ किनारपट्टीवर जोरदार वारे वहात असून अरबी समुद्र  खवळलेला आहे. त्यामुळेे मच्छीमारांनी कर्नाटक, केरळ व लक्षव्दीपच्या समुद्रात 30 मे पर्यंत उतरू नये, असा इशारा  वेधशाळेकडून देण्यात आला आहे. केरळ आणि कर्नाटक किनारपट्टीवर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पणजी, म्हापसा, मडगाव तसेच राज्यातील इतर भागात रविवारी पहाटे पावसाने हजेरी लावली. तसेच पुढील 24 तासांतही  पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती गोवा वेधशाळेचे संचालक मोहन लाल साहू यांनी दिली. 

शनिवारी मध्यरात्री केपे येथे 4 मी.मी., दाबोळी, सांगे व  मुरगाव भागात 3 मी.मी., काणकोण येथे 2 मी.मी., म्हापसा, पेडणे व पणजी भागात 1 मी.मी. पाऊस पडला. रात्री पावसामुळे काही ठिकाणी पडझडही झाली. पहाटे   वादळी वार्‍यासह पडलेल्या पावसामुळे पणजीत वीज पुरवठा खंडित झाला होता.  सकाळी पुन्हा वीज पुरवठा सुरळीत झाला.वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, पावसामुळे तापमान काही अंशी घटले आहे. उकाड्यापासून लोकांना  काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.  रात्रीच्यावेळी पडलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. कमाल तापमान  32.5 अंश सेल्सिअस तर किमान  तापमान 23.7 अंश सेल्सिअस इतके नोंद झाले आहे. गेल्या 24 तासात पणजीत सर्वाधिक 35 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.