Tue, Mar 26, 2019 07:40होमपेज › Goa › स्थानिकांना टोल आकारू नका

स्थानिकांना टोल आकारू नका

Published On: May 28 2018 1:44AM | Last Updated: May 27 2018 11:47PMदाबोळी : वार्ताहर

वेर्णा ते मुरगाव बंदर दरम्यानच्या महामार्गावरून वाहतूक करणार्‍यांकडून टोल आकारण्यात येणार असल्याचे संकेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प अधिकारी दोड्डामणी यांनी दिले. परंतु, मुरगावचे नगराध्यक्ष दीपक नाईक यांनी स्थानिकांना टोल आकारणीतून वगळण्यात यावे,अशी सूचना करून टोल आकारणीला  विरोध दर्शवला आहे.सदर महामार्गावरून वाहतूक करणार्‍या सडा, बायणा, मांगोरहिल, नवे वाडे व इतर परिसरातील रहिवाशांकडून टोल आकारला जाऊ नये. महामार्ग प्राधिकरणाने या महामार्गावरून वाहतूक करणार्‍या व्यावसायिक वाहन चालकांकडून टोल आकारावा, असे दीपक नाईक यांनी सांगितले. जर स्थानिकांकडून टोल आकारण्यात आला तर आपला विरोध असेल, वेळप्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

वेर्णा चौक ते मुरगाव बंदर असा सुमारे 18 किलोमीटरचा महामार्ग बांधण्यात येत आहे. वीस वर्षापूर्वी या महामार्गाचे काम सुरू झाले होते. तथापी मार्गात अनेक अडचणी आल्याने या महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झाले नाही.  वेर्णा चौक ते वरूणापूरी हा तेरा किलोमीटरचा रस्ता मात्र दहा वर्षापूर्वीच पूर्ण झाला होता. या महामार्गावरून सध्या मोठ्या प्रमाणात लहानमोठ्या वाहनांची वर्दळ सुरू असते. त्यामुळे वास्को कुठ्ठाळी मार्गावरील ताण मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. वरूणापूरी ते मुरगाव बंदर या पाच किलोमीटरच्या महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. या मार्गात काटेबायणा ते मुरगाव बंदर दरम्यान उड्डाण पूल बांधण्याचे काम जोरात चालू आहे. या पुलाला बायणा रवींद्र भवन येथून सडा येथे जाण्यासाठी तारीवाडापर्यंत एक फाटा देण्यात आला तसेच शहर भागात येण्यासाठी आयओसी चौकात एक फाटा देण्यात येणार आहे. यामुळे एफ.एल. गोम्स मार्ग  हा भाजी मार्केटपर्यंत बंद होण्याची भीती निर्माण झाल्याने या फाट्याला आमदार कार्लुस आल्मेदा यांनी हरकत घेतली आहे. त्यामुळे त्यावर उपाययोजना काढण्यासाठी तेथील फाट्याचे काम बंद करण्यात आले आहे. 

येत्या काही महिन्यांमध्ये या महामार्गाचे काम पूर्ण झाल्यावर तो मुरगाव बंदरापर्यंत वाहनांसाठी खुला करण्यात येईल. तथापी केंद्र सरकारच्या नियमानुसार नवीन महामार्गावर झालेला खर्च जोपर्यंत वसूल होत नाही तोपर्यंत  वाहतूक करणार्‍याकडून टोल आकारण्यात येतो. त्यामुळे  महामार्ग 17 ब वरून वाहतूक करणार्‍या वाहनचालकांकडून टोल आकारण्यात येणार असल्याचे संकेत दोड्डा्मणी यांनी दिले. 20 किमी. परिसरात राहणार्‍यांना   टोलमध्ये सूट देऊन मासिक पास देता येेईल,असे दोड्डामणी यांनी सांगितले.