Thu, Jul 18, 2019 21:21होमपेज › Goa › जनमत कौल चौकात बस थांबा नको 

जनमत कौल चौकात बस थांबा नको 

Published On: Jan 23 2018 1:15AM | Last Updated: Jan 22 2018 11:47PMमडगाव : प्रतिनिधी 

नव्याने नामकरण झालेल्या जनमत कौल जंक्शनवर वाहतूक खोळंबा रोखण्यासाठी प्रवासी बसेसना थांबे  देऊ नयेत, तसेच या जंक्शनवर थांबून लोकांना चलन देण्याचे प्रकारही बंद करावेत, अशा सूचना   बोर्डा येथे घेतलेल्या रविवार  संवाद कार्यक्रमात नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी उपजिल्हाधिकारी, वाहतूक पोलिस तसेच वाहतूक खात्याच्या अधिकार्‍यांना दिल्या.

फातोर्डा मतदारसंघातील लोकांसाठी सरदेसाई यांनी बोर्डा येथील ‘मल्टिपर्पज’च्या आवारात रविवार संवाद (संडे डायलॉग) चे आयोजन केले होते.या वेळी मोठ्या प्रमाणात लोक उपास्थित होते. जनमत कौल जंक्शनवर कोणत्याही बसेस थांबू नयेत तसेच पोलिसांनी जंक्शनवर थांबून चलन देऊ नये, अशा सूचनाही  मंत्री सरदेसाई यांनी दिल्या. वाहतूक कोंडी व बेशिस्त वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी प्रत्येकाने कुठेही पार्किंग करण्याची आपली सवय बदलण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. सरकारने पार्किंग साठी कोलवा सर्कल ते कदंबा बसस्थानकापर्यंत मोठ्या प्रमाणात जमीन संपादित केली आहे.लोकांनी त्याचा वापर करावा, त्याच बरोबर रवींद्र भवन परिसरात बहुमजली वाहनतळ प्रकल्प उभारण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले

लोकांच्या वाहतुकीबद्दलच्या तक्रारींवरून मंत्री सरदेसाई यांनी मडगाव वाहतूक विभागाचे निरीक्षक मोहन गावडे यांच्याशी चर्चा  केली. वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टीने मडगाव आणि फातोर्डा परिसरात नियमित पेट्रोलिंग करण्यासाठी एक पथक नियुक्त करा, असे  त्यांनी सांगितले.निरीक्षक गावडे यांनी वाहतूक विभागात कर्मचार्‍यांची संख्या कमी असल्याचे सरदेसाई यांच्या निदर्शनास आणून दिले. रस्त्याच्या बाजूला असलेली बेवारस वाहने आणि बसेस तात्काळ काढून टाका, असे आदेश त्यांनी पोलिस विभागाला दिले.लोकांना नो पार्किंगमध्ये वाहने उभी केल्यास तुम्ही त्यांना चलन देता तर बेवारस वाहने न काढल्याबद्दल तुम्हाला कोण चलन देणार, अशा शब्दात त्यांनी अधिकार्‍याची कानउघाडणी केली.गरज भासेल अशा रस्त्यांची पाहणी करून दुभाजक बसवण्याच्या सूचना त्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला दिल्या.

न्यायालय परिसरात पाणी तुंबत असल्याची तक्रार लोकांनी  मंत्र्यांकडे तक्रार केली असता बांधकाम खात्याने पाहणी करून उपाययोजना राबवाव्यात, असे ते म्हणाले. आगाळी ते फॅब इंडियापर्यंत रिंग रोड झाल्यानंतर बोर्डा भागातील वाहतूक सुरळीत होईल, असे ते म्हणाले. काही लोकांनी फातोर्डा परिसरात दारू आणि ड्रग्स सेवन करणार्‍या युवकांवर नजर ठेवण्याची मागणी केली. त्यावर पोलिस निरीक्षक नवलेश देसाई यांच्या मोबाईल क्रमांकांवर फोन करून तक्रारी द्या, असे  सरदेसाई यांनी सांगितले.

रात्री अपरात्री दारू ढोसून धिंगाणा घालणार्‍या आणि मोठ्या आवाजात आपल्या वाहनामध्ये संगीत लावणार्‍यांवर कारवाई करण्यासाचेे आदेशही त्यांनी दिले. बोर्डा भागातील एक बारवर कारवाई करण्यामागे लोकांच्या तक्रारी कारणीभूत होत्या, त्यामागे कोणतेच राजकीय कारण नसल्याचे त्यांनी सांगितले.सध्याच्या कदंबा बस स्थानकाची एक शेड म्हणून नोंदणी आहे त्या जागी नवीन बसस्थानक उभारण्याचा प्रस्ताव असल्याचे ते म्हणाले. जुना प्रस्ताव रद्द करून नवीन प्रस्ताव सादर करण्यात येईल,असेही सरदेसाई म्हणाले.