Thu, Apr 25, 2019 22:09होमपेज › Goa › सामाजिक विकासात महिलांचे योगदान महत्त्वाचे

सामाजिक विकासात महिलांचे योगदान महत्त्वाचे

Published On: Mar 11 2018 1:19AM | Last Updated: Mar 11 2018 12:25AMहोंडा : वार्ताहर

महिलांनी महिला मंडळाच्या माध्यमातून सामाजिक विकासकामांत योगदान देण्याची गरज आहे. आजच्या युवा पिढीला योग्य दिशा देण्याचे कार्य ही महिला मंडळाच्या सदस्यांनी केले पाहिजे, असे प्रतिपादन होंडा जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती वाडकर यांनी केले. भुईपाल धनगरवाडा येथे अहिल्याबाई होळकर जी. डी. एस महिला मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

व्यासपीठावर होंडा सरपंच आत्मा गावकर, पंचायत पांडुरंग गावकर, सया पावणे, पिसुर्ले पंचायतीचे माजी सरपंच सगुण वाडकर, गोवा धनगर समाज सेवा संघाचे अध्यक्ष बी.डी.मोटे, महिला मंडळाच्या अध्यक्षा वंदना पावणे, माजी अध्यक्ष नंदिता वरक, स्वातंत्र्यसैनिक भैरू वरक, गावचे ज्येष्ठ नागरिक धाकटू दवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

सरस्वती वाडकर  म्हणाल्या, की अहिल्याबाई होळकर महिला मंडळाचे कार्य उल्लेखनीय असून येणार्‍या काळात सदर काम  द्विगुणित करण्यासाठी सर्व महिलांनी संघटित पणे कार्य करण्याची गरज असल्याचे शेवटी वाडकर यांनी सांगितले.

पिसुर्लेचे पंचायत सदस्य सगुण वाडकर म्हणाले, की धनगर समाज आज मागे राहिला नसून इतर समाजापेक्षा पुढे गेला आहे. गोवा धनगर समाजाचे अध्यक्ष बी. डी. मोटे म्हणाले, की मागील काही वर्षातील धनगर समाज आणि आताचा धनगर समाज यात जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळे याही पेक्षा समाजाला पुढे नेण्यासाठी महिलांच्या सहकार्याची अत्यंत गरज आहे.

महिला मंडळाच्यावतीने गावच्या ज्येष्ठ महिला नागी वरक, पागी दवणे, महिला मंडळ स्थापन करण्यात पुढाकार घेतलेले सया पावणे, पवन वरक यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. त्याच प्रमाणे विविध स्पर्धेत यश प्राप्त केलेल्या महिलांना बक्षिसे देण्यात आली.  महिला मंडळाच्या अध्यक्षा वंदना पावणे यांनी स्वागत केले.  सूत्रसंचालन नीता वरक यांनी केले. नितिशा वरक यांनी आभार  मानले.