Sat, Feb 16, 2019 07:17होमपेज › Goa › मालमत्ता जाहीर न केल्यास नगरसेवक अपात्र : डिसोझा

मालमत्ता जाहीर न केल्यास नगरसेवक अपात्र : डिसोझा

Published On: Jun 27 2018 1:20AM | Last Updated: Jun 27 2018 12:09AMपणजी : प्रतिनिधी

राज्यातील ज्या नगरसेवकांनी आपली मालमत्ता गोवा लोकायुक्‍तांसमोर जाहीर केली नाही, त्यांना अपात्र ठरवण्यासाठी कायदा बनवला जाणार आहे. यासाठी येत्या पावसाळी अधिवेशनात गोवा नगरपालिका कायद्यात दुरुस्ती सुचवणारे विधेयक आणले जाणार आहे, अशी माहिती नगरविकासमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी दिली. 
नगरसेवकांनी आपल्या मालमत्तेचे तपशील वेळोवेळी उघड न केल्यास ते अपात्र ठरू शकतात. यासाठी येत्या अधिवेशनात राज्य सरकारतर्फे पालिका कायद्यात दुरुस्ती विधेयक आणण्याची तयारी सुरू झाली आहे, असे त्यांनी सांगितले.

गोवा लोकायुक्‍तांनी सर्व लोकप्रतिनिधींना दरवर्षी आपली मालमत्ता जाहीर करण्याचे आदेश देऊनही त्या आदेशाचे पालन केले जात नसल्याबद्दल संताप व्यक्‍त केला होता. राज्यातील 14 ही नगरपालिकांतील  नगरसेवकांची नावे लोकायुक्त पी. के. मिश्रा यांनी नुकतीच जाहीर केली असून त्यांची यादी राज्यपाल मृदूला सिन्हा यांच्याकडे पाठवली आहे. पावसाळी अधिवेशनात ही यादी सभागृहात मांडली जाण्याची शक्यता आहे. 

एका प्रश्‍नाला उत्तर देताना  मंत्री डिसोझा म्हणाले की, राज्यातील पालिकांवर नियंत्रण करणारा गोवा नगरपालिका कायदा हा महाराष्ट्र पालिका कायद्याच्या आधाराने बनवला गेला होता. राज्याच्या गरजेनुसार या कायद्यात बदल करण्याचा स्थानिक सरकारला हक्क आहे. राज्यातील सर्व नगरसेवकांना अधिक जबाबदार लोकप्रतिनिधी बनवण्यासाठी सदर कायद्यात आता दुरूस्ती करण्याची वेळ आली आहे.