होमपेज › Goa › वीजमंत्री मडकईकरांविरोधातील अपात्रता याचिका फेटाळली

वीजमंत्री मडकईकरांविरोधातील अपात्रता याचिका फेटाळली

Published On: Jul 11 2018 1:36AM | Last Updated: Jul 11 2018 1:36AMपणजी : प्रतिनिधी

कुंभारजुवेचे आमदार तथा वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांच्या विरोधातील अपात्रता याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने मंगळवारी फेटाळून लावली.विधानसभेच्या 2017 सालच्या निवडणुकीतील कुंभारजुवे मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार झेवियर  फियेलो यांनी  मडकईकर यांना  अपात्र ठरवण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात  दाखल केली होती.मडकईकर यांनी भाजप तर फियेलो यांनी काँग्रेसच्यावतीने 2017 सालची विधानसभा निवडणूक कुंभारजुवे मतदारसंघातून लढवली होती. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी मडकईकर यांनी भ्रष्ट

मार्गाने मतदारांना भेटवस्तू तसेच गिफ्ट कुपनचे वाटप करून त्यांना आमिष दाखवले, असा आरोप फियेलो यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या   याचिकेत केला होता.मडकईकर यांनी निवडणूक काळात भ्रष्टाचाराचा मार्ग स्वीकारल्याने  त्यांना अपात्र ठरवावे, अशी मागणी फियेलो यांनी  आपल्या याचिकेत केली होती. परंतु फियेलो यांना  हे आरोप सिध्द करणारे पुरावे सादर करता न आल्याने न्यायालयाने  त्यांची ही याचिका फेटाळून लावली. 2017 च्या विधानसभा निवडणुकीनंतर फियेलो यांनी तातडीने ही अपात्रता याचिका न्यायालयात दाखल केली होती.