Sun, Feb 23, 2020 11:28होमपेज › Goa › कर्नाटकाविरूद्ध आज अवमान याचिका 

कर्नाटकाविरूद्ध आज अवमान याचिका 

Published On: Jul 25 2018 1:37AM | Last Updated: Jul 25 2018 1:37AMपणजी : प्रतिनिधी

कर्नाटक राज्याने म्हादई नदीचे पाणी वळविल्याप्रकरणी राज्य सरकार दिल्ली येथील जलतंटा आयोगासमोर बुधवारी अवमान याचिका दाखल करणार असल्याचे जलस्त्रोत मंत्री विनोद पालयेकर यांंनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले. कळसा नदीचा प्रवाह कर्नाटक निरावरी निगमने कणकुंबीत कालव्याला भगदाड पाडून मलप्रभा नदीत वळवल्याच्या पार्श्‍वभूमीवर जलस्त्रोत मंत्र्यांशी  दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी वरील माहिती दिली.

कर्नाटक अणि गोवा राज्यातून म्हादई नदी वाहत असून या पाण्याचा वापर कर्नाटक राज्यातील शेतकर्‍यांना करता यावा यासाठी प्रवाह वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणी जलतंटा आयोगासमोर सुनावणी सुरू असून हा खटला अंतिम टप्प्यात आहे. आयोगाने या प्रकरणी निकाल द्यायचा आहे. त्याआधीच भूमिगत मार्गाने म्हादईचा प्रवाह वळवल्याचे निदर्शनास आल्यासंदर्भात मंत्री पालयेकर बोलत होते. पालयेकर म्हणाले की, आयोगाकडून पुढील महिन्यात कर्नाटक आणि गोवा राज्यात म्हादई जलतंट्यावर निर्णय होणार आहे. आयोगाच्या निर्णयाची वाट न पाहताच म्हादई नदीचा प्रवाह वळवण्याचे काम कर्नाटकाने सुरू केले असून हे कृत्य आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन ठरत असल्याचे  गोव्यातर्फे  लवादाच्या निदर्शनास आणून दिले जाणार आहे.   राज्यातील पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांनी ही बाब सरकारच्या निदर्शनास  आणून दिली असून त्यात तथ्य  असल्याचे आढळून आल्याने बुधवारी कर्नाटकविरूद्ध अवमान याचिका दाखल केली जाणार आहे. कर्नाटकाने याआधी राज्याकडे येणारा म्हादई नदीचा प्रवाह अडवण्याचे केलेले प्रयत्न राज्य सरकारने हाणून पाडले होते, असेही ते म्हणाले.

तब्बल 5 कि.मी. अंतराचा भूमिगत कालवा

मंत्री पालयेकर म्हणाले की, खात्याचे वरिष्ठ अधिकारी दिल्लीला रवाना झाले असून बुधवारी जलतंटा आयोगासमोर बेकायदेशीररित्या पाणी वळवल्याचे सप्रमाण दाखवण्यात येणार आहे. कळसा नदीचे पाणी वळविण्याचे कर्नाटकाचे षडयंत्र सुरू आहे. राज्य जलस्त्रोत खात्याच्या अधिकार्‍यांनी मंगळवारी कणकुंबी-कर्नाटक येथे केलेल्या पाहणीत म्हादई नदीचा प्रवाह कर्नाटक राज्याने कोणालाही समजू नये, म्हणून 5 कि.मी. अंतराच्या भूमिगत कालव्याच्या मार्गाने वळविला असल्याचे आढळून आले आहे.