Tue, Nov 20, 2018 20:03होमपेज › Goa › ‘दीनदयाळ’ योजनेवर उद्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा : राणे

‘दीनदयाळ’ योजनेवर उद्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा : राणे

Published On: Jun 24 2018 1:33AM | Last Updated: Jun 24 2018 12:30AMपणजी : प्रतिनिधी 

राज्यातील आरोग्य खात्याशी निगडित महत्त्वाच्या सर्व विषयांवर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी सोमवारी (दि.25) दुपारी 3 वाजता होणार्‍या आढावा बैठकीत चर्चा होणार आहे. यात दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजनेवर फेरविचार करण्याबाबतही  विशेष चर्चा होईल, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

मंत्री राणे म्हणाले, दिल्लीत आयोजित एका परिषदेत गेलो असता गुजरात येथील आरोग्य विषयक विमा योजना ही गोव्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे लक्षात आले. या योजनेसंदर्भात जाणून घेण्यासाठी राज्यातील आरोग्य सचिव, संचालक, अतिरिक्त सचिव यांची समिती   पुढील आठवड्यात गुजरातला रवाना होईल. गुजरातमध्ये ही समिती तेथील आरोग्य सचिवांशी चर्चा करून योजनेसंदर्भात माहिती घेणार आहे. गुजरातमध्ये ही योजना विशिष्ट मॉडेलवर आधारित आहे. त्यासंदर्भात समितीद्वारे मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर केला जाईल.

यासंदर्भात मुख्यमंत्री पर्रीकरांशी त्यानंतर चर्चा केली जाणार असून त्यानंतरच दीनदयाळ योजनेवर योग्य निर्णय घेण्यात येईल. या योजनेसंदर्भात  सोमवारी  सविस्तर चर्चा होईल,असेही राणे यांनी सांगितले. दरम्यान, दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. यासंदर्भात  कंत्राटदार व जीएसआयडीसीच्या अधिकार्‍याांशी चर्चा झाली आहे. सहा महिन्यांत या इस्पितळाचे लोकार्पण करू, असेही मंत्री राणे यांनी सांगितले. 

‘क्लिनिक इस्टॅब्लिशमेंट अ‍ॅक्ट’चा प्रस्ताव मांडणार 

क्लिनिक इस्टॅब्लिशमेंट अ‍ॅक्ट हा फार महत्त्वाचा कायदा असून राज्यात  या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी येत्या विधानसभा अधिवेशनात  तो मांडणार आहे, असे आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी सांगितले. यावर चर्चा व्हावी यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. मुंबईतील कोकिळाबेन इस्पितळाकडून ब्रेनस्ट्रोक विभागासाठी सहयोगाचा  प्रस्ताव आला असून आम्ही या प्रस्तावावर विचार करणार आहोत. राज्यात ब्रेनस्ट्रोकच्या रुग्णांची वाढती संख्या पाहून हा निर्णय घेण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.