Mon, Mar 25, 2019 13:55



होमपेज › Goa › ‘सीआरझेड’मधील बांधकामाचे आता होणार डिजिटल सर्वेक्षण

‘सीआरझेड’मधील बांधकामाचे आता होणार डिजिटल सर्वेक्षण

Published On: Mar 01 2018 1:42AM | Last Updated: Mar 01 2018 12:22AM



पणजी : प्रतिनिधी

गोव्यातील किनारपट्टी भागात सीआरझेडमध्ये येणार्‍या सर्व बांधकामांचे आता ‘डिजिटल’ सर्वेक्षण होणार आहे. त्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 
मुंबई  उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या आदेशानुसार याआधी 2006- 2007 मध्ये सीआरझेड मधील बांधकामांचे सर्वेक्षण झाले होते. हैदराबाद येथील ‘मेसर्स रिमोट सेन्सिंग’  या संस्थेने केलेला सर्वेक्षण अहवाल सरकारला 2008 मध्ये प्राप्त झाला होता. 

या सर्वेक्षण अहवालानुसार, 1991 नंतर सीआरझेड-3 विभागात अर्थात भरती रेषेपासून 200 मीटर ते पाचशे मीटर अंतरात अनेक नवीन बांधकामे झालेली आहेत. खासकरून पेडणे तालुक्यातील हरमल,  मांद्रे, मोरजी तसेच बार्देस तालुक्यातील कळंगुट आणि कांदोळी, सासष्टी तालुक्यातील कोलवा व बाणावली, मुरगाव तालुक्यातील वेळसांव, आरोसी, केपेे तालुक्यातील नाकेरी, काणकोण तालुक्यातील खोला, आगोंदा, पैंगीण, पाळोळे भागात मोठ्या प्रमाणात बांधकामे झालेली आहेत. राज्यात अनेक ठिकाणी नद्यांच्या किनार्‍यांवर अनेक नवी आणि अनधिकृत बांधकामे झाल्याच्या  तक्रारी आहेत. सीआरझेड  उल्लंघनाबाबतच्या तक्रारी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठापर्यंत  पोहोचल्या आहेत. राष्ट्रीय हरित लवादाकडेही अनेक प्रकरणे आहेत.  ‘ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम’ अर्थात जीपीएसद्वारे होणार्‍या या सर्वेक्षणानंतर बांधकामांच्या बाबतीत झालेली अनेक उल्लंघने उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले.