Fri, Mar 22, 2019 23:51होमपेज › Goa › डिचोली, वाळवंटी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली

डिचोली, वाळवंटी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली

Published On: Jul 07 2018 1:35AM | Last Updated: Jul 07 2018 1:14AMडिचोली ः प्रतिनिधी 

डिचोली तालुक्याला शुक्रवारी  मुसळधार पावसाचा  तडाखा बसल्याने डिचोली व वाळवंटी, अस्नोडा,  पार  नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने अनेक रस्ते पाण्याखाली गेले.त्यामुळे संपूर्ण  तालुक्याचे जनजीवन विस्कळीत झाले. नानोडा  भटवाडी येथील काही घरांमध्ये  पाणी शिरल्याने तीन कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. अंजुणे  व आमठाणे   धरणांच्या पातळीत वाढ झाली असून  पावसाचा  जोर आजही (शनिवारी)  वाढण्याची  शक्यता  लक्षात घेऊन प्रशासनाने  अतिदक्षतेचा इशारा दिला असून नदीकाठच्या रहिवाशांनी   काळजी  घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

डिचोली आपत्कालीन नियंत्रण कक्ष सक्रिय  करण्यात आला असून संपूर्ण तालुक्यातील  सर्व पंचायती व नगरपालिका विभागात फिरते पथक कार्यरत करण्यात आले आहे , तालुक्यात गुरुवारी रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसाने  तसेच वरच्या पट्ट्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती  निर्माण झाली.मात्र दुपारनंतर पाण्याची पातळी ओसरून स्थितीत सुधारणा झाल्याने धोका टळला असून सतर्कता कायम असल्याचे  मामलतदार प्रवीणजय  पंडित यांनी सांगितले.

डिचोली डिचोली तालुक्यात गेल्या बारा तासात 188 मिमी पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत 1390मिमी पावसाची नोंद झाली आहे,अशी माहिती के.पी. नाईक यांनी दिली 
अस्नोडा येथील पार नदीच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने घातलेल्या  बंधार्‍याच्या प्लेट्स न काढल्याने पावसाच्या जोरात अनेक घरांमध्ये पाणी गेले व मोठ्या प्रमाणात हानी झाली. 

मामलतदारांकडून पाहणी  

साखळीतील वाळवंटी नदीने रुद्रावतार धारण  केला असून बाजारपेठेत पाणी येऊ नये,यासाठी  खास बसवण्यात आलेल्या पंपिंग स्टेशनमधून दोन पंप सुरु करून मोठ्या प्रमाणात नाल्यातील पाणी नदीच्या पात्रात  सोडले जात आहे.  डिचोली नदीनेही  धोक्याची पातळी ओलांडल्याने अनेक ठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली  असून डिचोली सर्कलजवळच्या  रस्त्यांवर काठोकाठ पाणी भरले  होते.अस्नोडा येथील पार नदीनेही  रुद्रावतार  धारण केला असून या भागातील काही घरांची पाणी  शिरल्याने हानी झाली आहे,असे सांगण्यात आले.

नानोडा  गावाला फटका 

भटवाडी नानोडा येथील  रस्ता सकाळी पाण्याखाली  गेला,अनेक  घरांमध्ये  पाणी घुसले  तर काही ठिकाणी बागायतीत   पाणी शिरल्याने  अनेकांचे सामानही   वाहून  गेल्याचे सांगण्यात आले.तीन घरांना फटका बसल्याने काही परिवारातील सदस्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

जलस्त्रोत खात्याचे अभियंते के. पी. नाईक यांनी  सांगितले,की दुपारपासून परिस्थिती  पूर्ण नियंत्रणात असून दोन्ही पंप  सुरू करून पाणी खेचण्याचे काम सुरु आहे. वाळवंटी व डिचोली व पार नदीला पूर आला होता, मात्र आता धोका टळला आहे.आपत्कालीन नियंत्रण कक्षाच्या पथकाने या कुटूंबातील लोकांना  सुरक्षित ठिकाणी ठेवले  असून कोणताही धोका नाही  पावसाचा जोर वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन  सुरक्षेचा उपाय म्हणून याबाबत काळजी घेतली जात आहे.

पुराचा धोका लक्षात घेऊन   रहिवाशांनी कृपया आपत्कालीन   कक्षांशी  संपर्क साधावा,असे आवाहन मामलतदार यांनी केले . मामलतदार पंडित यांनी  पुराचा तडाखा बसलेल्या भागाचा दौरा करून पूर परिस्थितीचा  आढावा घेतला.  डॉ  प्रमोद सावंत  राजेश पाटणेकर  माजी  आमदार नरेश  सावळ यांनी या भागाला भेट  देऊन पीडित परिवारातील लोकांना  दिलासा दिला. साखळीचे नगराध्यक्ष धर्मेश सगलानी  यांनी साखळी शहर  परिसरातील परिस्थितीचा आढावा घेतला.  साखळी पालिकेतर्फे उभारण्यात येणार्‍या बोडके मैदानाला पावसामुळे तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते.