Tue, Jan 22, 2019 20:56होमपेज › Goa › सुर्ल, सोनशीतील कामगारांना कामावर न येण्याची नोटीस

सुर्ल, सोनशीतील कामगारांना कामावर न येण्याची नोटीस

Published On: Mar 24 2018 1:48AM | Last Updated: Mar 24 2018 1:48AMडिचोली : प्रतिनिधी 

डिचोलीतील 300 कामगारांना  कामवार न येण्याची नोटीस बजावल्यानंतर शुक्रवारी सेझा कंपनीच्या व्यवस्थापनाने सुर्ल, सोनशी व कोडली खाणीतील कामगारांनाही उद्यापासून कामावर न येण्यासंदर्भात नोटीस बजावली आहे. गरज असेल तेव्हाच कामावर बोलावले जाईल, असे त्या नोटीसीत म्हटले आहे. तसेच पुढील निर्णय होईपर्यंत कामगारांना पगार दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले  आहे. 

कंपनीने कामगारांना घरीच बसा, असे सांगत काही मशीनरी हलवली आहे. त्यामुळे कामगार वर्गात अस्वस्थता निर्माण झालेली आहे. कंपनीने कामगारांना पुढील पगाराची व कामाची लेखी हमी द्यावी, अशी मागणी कामगार संघटनेने केली आहे. त्याबाबत व्यवस्थापनाने वरिष्ठ अधिकारी वर्गाशी बोलून निर्णय कळवणार असल्याचे  उपजिल्हाधिकार्‍यांना सांगितले. कामगार संघटनेचे निलेश कारबोटकर,      

किशोर लोकरे,  कामगारांचे सल्लागार अजय प्रभुगावकर तसेच कंपनी व्यवस्थापनातर्फे मांद्रेकर उपस्थित  होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक आहे.  त्यामुळे काहीच  करता येणार नसल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी कामगारांना सांगितले.  खर्चात कपात करण्यासाठी हा निर्णय घेतला असून कामगारांना कसलाच धोका नाही, असेही सांगण्यात आले. उपजिल्हाधिकारी प्रदीप नाईक यांनी कंपनीला कामगारांना  लेखी हमी देण्याची सूचना केली आहे. दरम्यान, कामगारांनी मंत्री सुदिन ढवळीकर यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात माहिती दिली, व यावर तोडगा काढण्याची विनंती केली. त्यावर ढवळीकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आपण या सर्व प्रकाराची कल्पना देणार असल्याचे आश्‍वासन दिल्याचे सांगण्यात आले.