Wed, Jul 24, 2019 05:59होमपेज › Goa › कर्नाटकने कळसा कालव्याचा प्रवाह रोखला

कर्नाटकने कळसा कालव्याचा प्रवाह रोखला

Published On: Jan 13 2018 1:11AM | Last Updated: Jan 12 2018 11:22PM

बुकमार्क करा
डिचोली ; प्रतिनिधी

म्हादईप्रश्‍नी जलतंटा लवादासमोर सुरू असलेली सुनावणी अंतिम टप्प्यात असताना कर्नाटक निरावरी निगमने गुरूवारी गोव्याच्या दिशेने येणारा कळसा कालव्याचा नैसर्गिक जलप्रवाह  कणकुंबीत मातीचा भराव टाकून रोखला. त्यामुळे म्हादईप्रश्‍नी  गोव्यापुढे नव्या संकटाची भर पडली आहे. केरी येथील विवेकानंद पर्यावरण जागृती फौजेच्या कार्यकर्त्यांनी कणकुंबी येथे भेट दिली     असता कर्नाटकने गोव्याकडे येणारा कळसाचा जलप्रवाह  रोखल्याचे आढळून आले, असे विठ्ठल शेळके तसेच दशरथ मोरजकर यांनी सांगितले.

गोव्याच्या दिशेने म्हादई अभयारण्यातून येणारा नैसर्गिक जलप्रवाह रोखल्याने बाराजण व लाडकेचा धबधबा पूर्णपणे आटलेला असून म्हादई अभयारण्यातील जीवसृष्टी व जैविक संपदेवर त्याचा परिणाम होणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. कर्नाटक निरावरी निगमकडून यापूर्वी काम करताना मातीचा भराव घातला तरी पाणी जाण्यासाठी जागा करूनच बांध घातले जायचे. शिवाय साठलेले पाणी कळसा नाल्यात सोडण्यासाठी पंपाद्वारे उपसा केला जात असे. मात्र, सध्या उपसा काम थांबले असून पाणी बंद केल्याने सत्तरीतील सुर्ल भागातील लाडकेचा वझर व  बाराजण धबधब्याचा स्त्रोत उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच कमी झाल्याने संकट ओढवणार आहे, असेही सूत्रांनी सांगितले.

म्हादईप्रश्‍नी सर्वोच्च न्यायालयात म्हादई बचाव आंदोलनाने दाखल  केलेल्या याचिकेवर सुनावणीच्या वेळी ऑगस्ट 2017 मध्ये  कर्नाटकने कळसा कालव्याचे कसलेच काम करणार नाही, अशी हमी दिली होती.त्यामुळे याचिका निकालात काढण्यात आली होती. तरी आता कळसा भांडुरा प्रकल्पाचे काम कर्नाटक निरावरी निगमने युध्दपातळीवर सुरू ठेवले आहे. दरम्याने सदर काम तातडीने पूर्ण करण्याचा आदेश निगमच्या अधिकार्‍यांनी दिल्याचे प्रकल्पाच्या कंत्राटदाराने सांगितले.