होमपेज › Goa › नवा सोमवार साठी डिचोली सज्ज

नवा सोमवार साठी डिचोली सज्ज

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

डिचोली : प्रतिनिधी

गोवा व इतर राज्यातही प्रसिध्दीस पावलेल्या डिचोलीच्या श्री देवी शांतादुर्गेच्या सुप्रसिध्द ‘नवा सोमवार’ उत्सव आज हजारो भाविकांच्या उपस्थितीत ख्यातनाम गायकांच्या मैफलींनी साजरा होणार आहे. उत्सवासाठीची सर्व तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे.

ग्रामस्थ गावकर मंडळ व आतील पेठ,दहाजण बाजारकर मंडळातर्फे या उत्सवानिमित्त विविधांगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.शांतादुर्गा मंदिरात गावकरवाडा व आतील पेठ येथे सकाळपासून धार्मिक विधी, दुपारी आरती व इतर कार्यक्रम होतील रात्रौ देवीची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. रात्री 10 वाजता आतील पेठ मंदिरात व पहाटे 10.30 वाजता औंदुबर ट्रस्ट, भायली पेठ येथे शास्त्रीय गायक ओंकार दादरकर व सायली तळवलकर यांच्या दोन मैफीली होणार आहेत. त्यांना विठ्ठल खांडोळकर, विभव खांडोळकर, विशांत सुर्लीकर, राहुल खांडोळकर साथ संगत करतील. शांतादुर्गा मंदिर परिसरात रात्री 10 वाजता शुक्रतारा निर्मित आकाशगंगा हा गायनाचा कार्यक्रम होणार असून धनंजय म्हसकर (मुंबई) व निलाक्षी पेढांरकर (मुंबई) याचे गायन होईल.दीपाली केरकर सूत्र निवेदन करतील.

पहाटे 1.30 वाजता श्री रवळनाथ मंदिराच्या प्रांगणात नाट्यभक्ती स्वररंग कार्यक्रमात मंदार आपटे (मुंबई), तन्मयी घाणेकर (मुंबई) यांचा कार्यक्रम होणार आहे. निवेदन ऋचा थत्ते करतील.डिचोली कोमुनिदाद मंदिरात राज्य पातळीवरील रांगोळी स्पर्धा होणार आहे. सम्राट क्लब बोर्डे-डिचोलीतर्फे वरचावाडा येथे 7 वाजता सूरश्रवण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यात सर्वेश माशेलकर, गीतगंधा गाड, प्रज्ञा गर्दे यांचा कार्यक्रम होईल. निलेश पेडणेकर, विठू च्यारी, सुरेश घाडी, दिलीप मुळगांवकर साथ करतील. डिचोली शांतादुर्गा उ.मा.विद्यालयातर्फे  तसेच राधाकृष्ण विद्यालयातर्फे विज्ञान व कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवासाठी डिचोलीत घराघरात रंगरंगोटी करून  कमानी उभारण्यात आल्या असून विद्यूत रोषणाई करण्यात आली आहे. हजारो भाविकांनी डिचोलीचा परीसर भक्तीमय होणार असून गायनाच्या मैफीलींनी सूर  व स्वरांची बरसात होणार आहे.