Wed, Mar 27, 2019 05:58होमपेज › Goa › शिक्षणातून संस्कार हरवतोय

शिक्षणातून संस्कार हरवतोय

Published On: Feb 01 2018 1:41AM | Last Updated: Feb 01 2018 1:41AM  डिचोली : प्रतिनिधी 

 सरकार शैक्षणिक विकासासाठी सर्व ती मदत देण्यास तयार आहे, मात्र प्रत्यक्षात  शिक्षणाचा दर्जा खालावला असून शिक्षणातून संस्कार हरवले आहेत असे दिसून येत आहे, अशी चिंता मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केली. काही शिक्षकांनी अध्यापनात सुधारणा करावी, यासाठी सरकार त्यांना संधी देत आहे, त्यासाठी अनेक प्रकारे तपासणी  सुरु आहे, त्यात शिक्षक दोषी  असल्याचे सिद्ध झाल्यास त्यांना घरचा रस्ता दाखवला जाईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. डिचोली दौर्‍यात शैक्षणिक समस्यांबाबत मंगळवारी शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चेवेळी मुख्यमंत्री बोलत होते.   मुख्यमंत्री म्हणाले, शिक्षणात मोठी प्रगती होणे गरजेचे असून समाजातील नकारात्मकता दूर होणे गरजेचे आहे. त्यासाठी शिक्षक हा महत्त्वाचा घटक आहे. अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये   प्रवेशाच्या नावाखाली भरमसाठ देणगी घेतली जाते. असे प्रकार  आढळल्यास   थेट आपल्याला फोन करा किवा लेखी तक्रार करा, आपण तातडीने कारवाई करू. 

सरकार शिक्षणासाठी मोठी मदत देते आहे, शिक्षकांनाही अनेक प्रकारे नवीन योजनांद्वारे शिक्षणात बदल केले आहेत, परंतु काही शिक्षक हेतू पुरस्सर शिक्षणाकडे दुर्लक्ष करीत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यावर चौकशी सुरु असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले. अनेक ठिकाणी काही शिक्षकांकडून इतर शिक्षक तसेच काही विद्यार्थ्यांना हेतुपुरस्सर लक्ष्य केले जात  सल्याच्या तक्रारी पालकांनी केल्या आहेत. शिक्षकांनी याबाबतीत सतर्क रहावे व वर्तन सुधारावे, जे दोषी आढळतील त्यांना  प्रसंगी नोकरी गमवावी लागेल.   शिक्षण क्षेत्रात कसलीही कसूर खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री पर्रीकर यांनी दिला. शिक्षण विभागातील गैरकारभाराचा सविस्तर आढावा घेण्याचे आदेश  संबंधित अधिकार्‍यांना देऊन अनेक प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक  विद्यालयात तपासणी सुरु केली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.