Thu, Apr 25, 2019 18:53होमपेज › Goa › लोहिया, कुन्हा यांचेही पुतळे उभारावेत

लोहिया, कुन्हा यांचेही पुतळे उभारावेत

Published On: Feb 07 2018 1:37AM | Last Updated: Feb 07 2018 12:24AMपणजी : प्रतिनिधी

गोवामुक्तीसाठी मोठे योगदान दिलेले डॉ. राममनोहर लोहिया, स्वातंत्र्यसैनिक टी. बी. कुन्हा यांचे पुतळे विधानसभा संकुलात उभारावे, असा खासगी ठराव महाराष्ट्रवादी गोमंतक (मगो) पक्षाचे आमदार दीपक पाऊसकर यांच्यातर्फे विधानसभेत आणला जाणार आहे. केवळ राजकीय लाभाच्या हेतूने विधानसभा आवारात पुतळे उभारण्यासाठी अनेक ठराव दाखल होत असल्याने त्याला विरोध करण्यासाठी ‘प्रतिहल्ला’ म्हणून ‘मगो’चे हे उत्तर असल्याचे ‘मगो’चे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी सांगितले. 

सांतइनेज-पणजी येथील ‘मगो’च्या मध्यवर्ती कार्यालयात केंद्रीय समितीच्या सदस्यांची आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाची उमेदवारी दिलेल्या उमेदवारांची मंगळवारी संध्याकाळी एकत्र बैठक पार पडली. या बैठकीत ‘मगो’तर्फे निवडून आलेले आमदार तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर, पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर तसेच गोवा साधनसुविधा विकास महामंडळाचे अध्यक्ष दीपक पाऊसकर हजर होते. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दीपक ढवळीकर म्हणाले की, ‘मगो’चे आमदार दीपक पाऊसकर हे फेब्रुवारीमध्ये होणार्‍या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चार खासगी ठराव मांडतील. विधानसभा संकुलात डॉ. राममनोहर लोहिया, स्वातंत्र्यसैनिक टी. बी. कुन्हा यांचे पुतळे उभारण्याचे स्वतंत्र ठराव यांचा त्यात समावेश असेल. याशिवाय राज्यातील मुख्य राज्य तथा जिल्हा महामार्गांना गोवामुक्तीसाठी संघर्ष केलेल्या स्वातंत्र्यसेनानींचे नाव द्यावे, आणि राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये योग शिक्षण सुरू करावे, असे खासगी ठराव आणले जाणार आहेत. 

काही सहकारी आमदार केवळ मताचे राजकारण करण्यासाठी खासगी ठराव आणण्याच्या प्रयत्नात आहेत. डॉ. जॅक सिक्वेरा यांचा पुतळा विधानसभा संकुलाजवळ बसवण्यास ‘मगो’चा विरोध नाही. मात्र, त्याआधी गोवा स्वातंत्र्यासाठी मोठे योगदान दिलेल्या लोहिया आणि कुन्हा यांचे पुतळे उभारणे अधिक महत्वाचे आहे. नावाला नव्हे तर कर्तृत्वाला अधिक महत्व असून केवळ मतांसाठी नको ते विषय घेऊ नये, असे ढवळीकर म्हणाले.

ज्या लोकांनी गोवामुक्तीमध्ये तसेच जनमत कौलावेळी कोणतेही योगदान दिले नव्हते, ते आज नेते म्हणून वावरत असून आपले कार्य आधी त्यांनी उघड करावे. आपण सर्व आधी भारतीय असून त्यानंतर गोमंतकीय आहोत. डॉ. सिक्वेरा आणि ‘गोंयकारपण’ यांच्या नावाने सवंग राजकारण केले जात असून जनतेची दिशाभूल केली जात असल्याची टीका  मंत्री सुदिन ढवळीकर यांनी कोणाचेही नाव न घेता केली.