Mon, Sep 24, 2018 19:43होमपेज › Goa › धनगरवाडीच्या  महिलांचा केपे पाणी कार्यालयावर मोर्चा 

धनगरवाडीच्या  महिलांचा केपे पाणी कार्यालयावर मोर्चा 

Published On: Feb 08 2018 1:44AM | Last Updated: Feb 07 2018 11:25PMमडगाव : प्रतिनिधी

केपे मतदार संघात बार्शे पंचायत क्षेत्रातील धनगरवाडीत भेडसावणार्‍या पाणी टंचाईकडे सार्वजनिक बांधकाम खाते  दुर्लक्ष करीत असल्याने या गावातील महिलांनी रिकाम्या घागरी आणि गढूळ पाण्याने भरलेल्या बाटल्या घेऊन केपेतील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढला. जोवर पाणी समस्येवर तोडगा काढला जात नाही तोवर कार्यालयातून बाहेर जाणार नाही, असा पवित्रा घेऊन महिलांनी सुमारे तीन तास कार्यालयात ठाण मांडून निदर्शने केली.

‘आप’च्या कार्यकर्त्यांनी आंदोलक महिलांना पाठिंबा दिला. ‘आप’कडून अभियंत्यांना निवेदन सादर करण्यात आले. जोवर पाण्याचा टँकर पाठविण्याबाबत अभियंते निर्णय घेत नाहीत तोवर घरी जाणार नाही, अशी भूमिका महिलांनी घेतली होती.

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांच्या विरोधात तसेच स्थानिक आमदार बाबू कवळेकर यांच्या विरोधात यावेळी घोषणा देण्यात आल्या. धनगरवाडी येथील महिलांनी दिलेल्या माहितीप्रमाणे पाण्यासाठी मारण्यात आलेले बोअर ड्रिल सुमारे चाळीस वर्षांपूर्वीचे आहेत आणि शंभर लिटर च्या टाक्यात पिण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी साठत नाही, असे  त्यांनी सांगितले.  

या  गावचे प्रमुख धुलो धनगर यांनी पत्रकारांना सांगितले,की काही महिन्यांपासून पाण्यासाठी गावकर्‍यांना वणवण फिरावे लागत आहे. हॅन्डपंपातून चिखलाचे पाणी येत असल्याचे ते म्हणाले.  ‘आप’च्या निमंत्रिका राजश्री नगर्सेकर यांनी म्हणाल्या, की तिनशे लोकसंख्या असलेल्या या गावाला जगण्यासाठी कठीण आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. पाणी, वीज, रस्ते यासारख्या सुविधांसाठी लोकांना त्रास सहन करावा लागत असल्याचेही त्या म्हणाल्या. सुमारे तीन तास  बांधकाम खात्याच्या कार्यालयात ठाण मांडल्यानंतर अभियंत्यांनी लोकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आश्‍वासन दिले आहे.