Mon, Jun 24, 2019 17:43होमपेज › Goa › स्वयंसाहाय्य गटांमुळे घर, गावाचा विकास : मृदुला सिन्हा

स्वयंसाहाय्य गटांमुळे घर, गावाचा विकास : मृदुला सिन्हा

Published On: May 06 2018 1:53AM | Last Updated: May 06 2018 1:43AMपणजी : प्रतिनिधी

केंद्र सरकारने स्वयंसाहाय्य गटांची निर्मिती ही फार विचार करून केलेली आहे. स्वयंसाहाय्य गटांच्या माध्यमातून महिला एक पाऊल पुढे येत आहेत. स्वयंसाहाय्य गटांच्या माध्यमातून घर आणि गावाचाही विकास होत आहे, असे मत राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी व्यक्त केले. 

गोवा राज्य ग्रामीण विकास संचालनालयातर्फे शनिवारी इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा संस्थेच्या सभागृहात ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत आयोजित ‘स्त्रीशक्ती’ व आजिविका दिवस या कार्यक्रमात राज्यपाल मृदुला सिन्हा प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. व्यासपीठावर केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, खासदार नरेंद्र सावईकर, खासदार विनय तेंडुलकर, ग्रामीण विकासमंत्री जयेश साळगावकर, उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षा अंकिता नावेलकर, दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष नवनाथ नाईक, ग्रामीण विकास संचालनालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. एन. शेट्ये, राज्यपाल यांचे सचिव रुपेश कुमार ठाकूर, स्नेहल प्रभू उपस्थित होते. 

सिन्हा म्हणाल्या, की स्वयंसहाय्य गटांच्या माध्यमातून महिलांना एकत्रित आणण्यात आले. महिलांमध्ये दुसर्‍यांसाठी काम करण्याची शक्ती असते व  या शक्तीचा सदुपयोग होतोे. गोव्यात शालेय मुलांच्या आहाराचे काम स्वयंसहाय्य गट करतात, ही मोठी कौतुकास्पद बाब आहे. 

श्रीपाद नाईक म्हणाले, की कचर्‍यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे. जीवनात अनेक आव्हाने आहेत, ते पार करताना नागरिक म्हणून आपण आपले कर्तव्य विसरत आहोत.  समाजाची मदत मिळाली तरच स्वच्छतेसारखे उपक्रम यशस्वी होतील. स्वयंसाहाय्य गटांचे काही प्रश्‍न आहेत, ते आपण दिल्लीत मांडू, असे आश्‍वासन त्यांनी उपस्थित महिलांना दिले. 

कामुर्लीच्या दीपा मोरजकर यांनी सांगितले, की केरळ सरकाराप्रमाणे गोव्यातही स्वयंसहाय्य गटांना मदत मिळाली पाहिजे.स्वयंसाहाय्य गटांसाठी स्वत:चे मार्केट असण्याची गरज आहे. संगीता गावकर (सरपंच, वझरी), मुस्कान नाईक (हंसापूर), श्रृती घाटवळ (मुळगाव), हेमा बुगडे (अस्नोडा), प्रणाली प्रभुगावकर (काणकोण), सुनीता जगताप (बाळ्ळी-केपे), श्रद्धा नाईक (असोल्डा-केपे), वैष्णवी परब (थिवी), प्रिया मळीक (लांटबर्से-डिचोली) या बचतगटांच्या सदस्यांनी आपले अनुभव कथन केले.