Thu, Jun 27, 2019 01:33होमपेज › Goa › फातोर्ड्यातील खुल्या जागांचा विकास करणार

फातोर्ड्यातील खुल्या जागांचा विकास करणार

Published On: Sep 10 2018 1:16AM | Last Updated: Sep 09 2018 11:34PMमडगाव : प्रतिनिधी

फातोर्डा मतदारसंघात असलेल्या 13 खुल्या भूखंडांचा विकास येत्या तीन महिन्यांत करण्यात येणार आहे. विकासाचे हे काम सार्वजनिक बांधकाम खात्याकडून केले जाणार आहे, असे   नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी सांगितले. विकास केल्यानंतर  पुढील देखभालीसाठी ती जागा मडगाव नगरपालिकेकडे सोपविण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

मंत्री सरदेसाई यांनी शनिवारी फातोर्डा मतदारसंघातील वेगवेगळ्या ठिकाणच्या  खुल्या असलेल्या  जागांची पाहणी केली. त्यांच्याबरोबर मडगाव नगराध्यक्षा डॉ. बबिता प्रभूदेसाई, उपनगराध्यक्ष टिटो कार्दोज, पालिकेचे ज्येष्ठ अधिकारी हर्षद प्रभूदेसाई, पालिका अभियंता मनोज आर्सेकर  उपस्थित होते. 

मंत्री सरदेसाई म्हणाले, की, फातोर्डा मतदारसंघातील खुल्या जागांचा विकास करण्यासाठी त्याचा आराखडा  गणेशचतुर्थीनंतर तयार करण्यात येणार आहे. व्ही फॉर फातोर्डासाठी अंकित प्रभूदेसाई यांची डिझायनर  म्हणून निवड करण्यात आली असून सर्व जागांचे डिझाईन त्या करणार आहेत. प्रभूदेसाई यांनी यापूर्वी फातोर्डा किरकोळ मासळी बाजाराचा आराखडा तयार केला होता. या 13 ही मोकळ्या जागांचा  आराखडा एकसारखाच राहणार असून गोमंतकीय साज देण्यात येणार आहे. दरम्यान, घोगळ येथील नेहरू पार्कची पाहणी करताना त्यांनी पालिका अभियंत्यांना उद्यानाच्या सभोवताली सुरक्षा भींत उभारण्यास सांगितली आहे. तर या उद्यानाची दुरुस्ती झाल्यावर हे शालेय विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी तसेच अन्य मुलांसाठी नेहमी खुले ठेवणार असल्याचे   मंत्री  सरदेसाई  यांनी सांगितले. 

बोल्शे सर्कलची रूंदी कमी करणार : सरदेसाई 

मडगाव शहरात  विशेषतः घोगळ येथे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी  बोल्शे सर्कलची रुंदी कमी करून सर्कलच्या एका बाजूचा रस्ता रुंद करण्यात येणार आहे,असे मंत्री विजय सरदेसाई यांनी सांगितले. ते म्हणाले, रस्ता रुंदीकरणासाठी सरकारने नोरोन्ह परेरा  यांच्या मालकीची 5 मीटर रुंदीची  1500 चौरस फूट जागा घेतली असून यासाठी परेरा याना टीडीआरची सुविधा प्राप्त होणार आहे.   येत्या 15 दिवसात खर्चाचा आराखडा तयार करण्यात येणार आहे.