Fri, Mar 22, 2019 23:53होमपेज › Goa › लाचप्रकरणी भूमी अभिलेख उपअधीक्षकासह दोघांवर गुन्हा 

लाचप्रकरणी भूमी अभिलेख उपअधीक्षकासह दोघांवर गुन्हा 

Published On: Feb 02 2018 1:33AM | Last Updated: Feb 01 2018 10:20PM कणकवली : प्रतिनिधी
घराच्या पायवाटेच्या मोजणीचे प्रकरण उपअधीक्षक भूमीअभिलेख कणकवली यांच्या कार्यालयात असून दिलेल्या तारखेच्या अगोदर लवकर मोजणी करून देण्यासाठी घोणसरीतील तक्रारदाराकडून 10 हजारांची लाच, छाननी लिपीकामार्फत (भूकरमापक)  स्वीकारल्याप्रकरणी भूमीअभिलेखचे उपअधक्षीक अजित पांडुरंग साळुंखे (32) आणि लिपीक  समीर सत्यवान गोलतकर (39) या दोघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी समीर गोलतकर याला पैसे स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली असून अजित साळुंखे याचा शोध सुरू होता. ही घटना गुरूवारी दुपारी 3.35 च्या सुमारास कणकवलीतील भूमीअभिलेख कार्यालयात घडली.  सलग दुसर्‍या दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्ह्यातील ही दुसरी कारवाई केली. बुधवारी वेंगुर्ले तालुक्यातील एका मंडळ अधिकार्‍याला लाच प्रकरणी अटक केली होती. गुरूवारी कणकवलीतील भूमी अभिलेख कार्यालयात दोघांवर कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे याच तक्रारदाराच्या तक्रारीवरून याच पायवाटेच्या विषयावरून दोन वर्षांपूर्वी घोणसरीच्या तत्कालीन ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. 

या प्रकरणातील घोेणसरीतील तक्रारदार यांनी सर्व्हे क्र. 16/56 या आपल्या घराजवळील पायवाटेची ग्रा. पं. नमुना नं. 26 मध्ये रजिस्टरला दोन वर्षापूर्वी नोंद होण्यासाठी ग्रा. पं. कडे अर्ज केला होता. त्या नोंदीसंबंधी महसूलकडील सर्व प्रकिया त्यांनी पूर्ण केली होती. मात्र या नोंदीसाठी  तत्कालीन ग्रामसेवकाने त्यांच्याकडे 10 हजाराची  लाच मागितल्याप्रकरणी त्याला अटक झाली होती. याप्रकरणानंतर घोणसरी ग्रामसभेने ती नोंद रद्द केली होती. त्यानंतर तक्रारदारवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकार्‍यांकडे मागणी केल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी त्या पायवाटेची नोंद घालण्याचे निर्देश ग्रा. पं. ला दिले होते. त्यानुसार ग्रा. पं. ने कणकवली भूमीअभिलेख कार्यालयाला या पायवाटेची मोजणी करण्यासाठी पत्र दिले होते.

त्या पत्राची प्रत तक्रारदार यांनाही पाठविली होती. त्यानंतर अलिकडेच तक्रारदाराने या पायवाटेच्या जमिनीची मोजणी ठरवून दिलेल्या तारखेच्या अगोदर करून देण्याची मागणी केली. त्यासाठी भूमिअभिलेख कार्यालय कणकवलीचे  उपअधिक्षक अजित पांडुरंग साळुंखे यांनी त्यांच्याकडे  पैशांची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सिंधुदुर्ग यांच्याकडे गुरूवारी सकाळी तक्रार केली होती.  त्याप्रमाणे या विभागाने  सापळा रचला होता. गुरूवारी सकाळी तक्रारदार कार्यालयात आल्यानंतर त्यांच्याकडे  उपअधीक्षक अजित साळुंखे यांनी 10 हजार रू. मागणी करून ते पैसे छाननी लिपीक (भूकरमापक) समीर सत्यवान गोलतकर यांच्याकडे देण्यास सांगून ते ओरोसला बैठकीचे कारण सांगून निघून गेले. त्यानुसार  दुपारी 3.35 च्या सुमारास तक्रारदार यांनी कार्यालयातच लिपीक समीर गोलतकर यांच्याकडे 10 हजार रू. दिले, त्याचवेळी सापळा रचलेले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शंकर चिंदरकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गोलतकर याला पैसे घेताना रंगेहाथ ताब्यात घेतले. 

या घटनेने भूमिअभिलेख कार्यालयात एकच खळबळ उडाली. समीर गोलतकर याचे जाब जबाब घेण्यात आले. त्यानंतर त्याला कणकवली पोलिस स्थानकात नेऊन समीर गोलतकर याच्यासह उपअधीक्षक अजित साळुंखे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अजित साळुंखे हे ओरोसला गेल्याने त्यांचा शोध सुरू असल्याचे अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने सांगितले. या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक मितीष केणी, पोलिस नाईक निलेश परब, पोलिस शिपाई श्री. पोतणीस, श्री.खंडे, श्री. जामदार, श्री. मसुरकर, श्री. पालकर, महिला पोलिस श्रीम. राऊळ, चालक श्री. पेडणेकर हे सहभागी झाले होते.