Mon, Mar 25, 2019 09:41होमपेज › Goa › पावसामुळे पेडणेत अनेक ठिकाणी पडझड

पावसामुळे पेडणेत अनेक ठिकाणी पडझड

Published On: Jun 13 2018 1:33AM | Last Updated: Jun 13 2018 1:33AMहणखणे : प्रतिनिधी

सोमवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे पेडणे तालुक्यात ठिकठिकाणी पडझड झाली. काल सकाळपासूनच वादळी वार्‍यासह पडलेल्या पावसामुळे पेडणे तालुक्यातील अनेक गावांमध्ये  रस्त्यावर झाडे उन्मळून पडली. तर काही ठिकाणी केळीच्या बागायती नष्ट झाल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान झाले. रस्त्याच्या कडेला असलेली धोकादायक झाडे अद्यापही कापण्यात आलेली नाहीत. ही झाडे पावसाळ्यात कोणत्याही क्षणी कोसळून पडून मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येण्यासारखी नाही.  

वास्तविक गावांमधील धोकादायक झाडे कापण्याची जबाबदारी स्थानिक पंचायतीकडे सोपविली तर ते अधिक प्रभावी ठरले असते. त्यासाठी ठराविक निधी पंचायतीकडे सुपूर्द करून ही जबाबदारी त्या त्या पंचायतीवर सोपविण्यात आले तर स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असत्या. स्थानिक पंचायत सदस्य यामुळे सक्रिय झाले असते, असे काही पंचायत सदस्यांनी बोलूनही दाखवले. सोमवारी वादळी वार्‍यासह हजेरी लावलेल्या पावसामुळे हसापूर येथे मुख्य रस्त्यावर एक भलेमोठे झाड उन्मळून पडले. त्यामुळे हसापूर भागातील वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. आपत्कालीन पथक तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन रस्ता मोकळा करेपर्यंत बराच वेळ निघून गेला.

याची दखल घेऊन चांदेल-हसापूर पंचायतीचे सरपंच संतोष मळीक यांनी काही ग्रामस्थांच्या सहकार्याने रस्त्यावरील पडलेले झाड हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. दरम्यान हळर्ण, इब्रामपूर भागात वादळी वार्‍यासह आलेल्या पावसामुळे केळीच्या बागायतींचे खूप नुकसान झाले. त्यामुळे काही शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.रस्त्याच्या बाजूला असलेले गटार अद्याप उपसले नसल्याने गटारांतील घाण पाणी आणि चिखल रस्त्यावर आला. वाहनांच्या वर्दळीमुळे रस्त्यावरील चिखल तसेच घाणपाणी येणार्‍या जाणार्‍यांच्या अंगावर उडाल्याने कपडे खराब होतात.