होमपेज › Goa › म्हापशात रविवार बाजारात स्थानिकांना जागा देण्याची मागणी

म्हापशात रविवार बाजारात स्थानिकांना जागा देण्याची मागणी

Published On: May 28 2018 1:44AM | Last Updated: May 27 2018 11:46PMबार्देश : प्रतिनिधी 

म्हापसा पालिकेच्या रविवारच्या बाजारात महाराष्ट्र, कर्नाटक व इतर राज्यातील व्यापारी येत असल्याने स्थानिक व्यापार्‍यांना नुकसान सोसावे लागते. यामुळे रविवारच्या बाजारात स्थानिक व्यापार्‍यांना पालिकेने जागा द्यावी, अशी मागणी व्यापार्‍यांतून होत आहे.म्हापसा पालिका मार्केटमध्ये जादा करून रविवारी कर्नाटकमधील व्यावसायिक अनेक वस्तू घेऊन विक्रीसाठी घेऊन येतात. यामध्ये भटकळ भागातील विक्रेते मोठ्या संख्येने असतात. 

म्हापसा बाजारात रोज व्यापार्‍यांची व ग्राहकांची गर्दी होते. शुक्रवारच्या आठवडी बाजारामध्ये ग्रामीण भागाबरोबरच गोव्याच्या आसपासच्या परिसरातील गावामधील व्यापारी, कोकणपट्टी व कर्नाटकाच्या जवळील भागातील व्यापारी आपल्याकडील साहित्य घेऊन येतात. त्यामुळे या शुक्रवारच्या आठवडी बाजारात भरपूर गर्दी होते. व्यापारी मिळेल त्या जागेत व्यापार करण्यासाठी आपल्याकडील माल घेऊन ठाण मांडून   बसतात. या प्रमाणाचे  रविवारच्या बाजारामध्ये हे परप्रांतीय व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित असतात आणि त्यांच्याकडील माल घेण्यास ग्राहकही गर्दी करतात. रविवारच्या बाजारात सदर व्यापारी एका रांगेत माल घेऊन बसतात. त्यामुळे ग्राहकांना त्यांचा त्रास होत नाही; परंतु हे व्यापारी दुचाकी वाहने ठेवण्याच्या जागेवरच आपला माल घेऊन व्यवसाय करत असल्याने बाजारात येणार्‍या दुचाकीस्वारांना आपली दुचाकी ठेवण्यास जागा मिळत नाही. 

या बाजारामध्ये लमाणी लोक मोठ्याप्रमाणात येतात. राज्यातील आणि परदेशातील जास्त करून लोक लमाण्यांच्या वस्तू खरेदी करतात. तर रेडिमेड कपडे कॉटवर घेऊन बसणार्‍या व्यापार्‍यांना चांगला व्यवसाय मिळतो. त्यांच्याकडील जिन पॅन्ट, टीशर्ट अशी लहान सहान कपडे, चप्पल, बूट  आदी वस्तू खरेदीसाठी ग्राहक येतात. तर लोखंडी साखळ्या, दाराची कुलूपे व इतर वस्तूही या रविवारच्या बाजारामध्ये मिळतात. त्या वस्तू काही प्रमाणात स्वस्त दरात मिळत असल्याने ग्राहक  वस्तू खरेदीसाठी रविवारच्याच दिवशी येतात. त्यामुळे स्थानिक व्यापार्‍यांना याचा फटका बसत असतो.  रविवारच्या बाजारामध्ये स्थानिक ग्रामीण व इतर व्यापारी येतात. मात्र, त्यांना आपले साहित्य विक्रीसाठी   जागा मिळत नाही. बाहेरील राज्यातील व्यावसायिक म्हापशात रविवारी आपला माल घेऊन व्यवसाय थाटतात. त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांची गोची होते. त्यांना मग मिळेल त्या लहास सहान जागेत बसून आपला माल विकावा लागतो. यामुळे आर्थिक प्राप्ती होत नाही.

रविवारच्या दिवशी दुकाने बंद असतात. त्यावेळी अनेकजण फूटपाथवरती बसून व्यवसाय करतात. ही एक संधी स्थानिक व्यावसायिकांना मिळते. यासाठी पालिकेने रविवारच्या दिवशी स्थानिक व्यावसायिकांना एखादी जागा आखून द्यावी, अशी स्थानिक व्यावसायिकांची मागणी आहे.