होमपेज › Goa › पूर्णवेळ मुख्यमंत्र्यासाठी शहांकडे मागणी करणार : गिरीश चोडणकर

पूर्णवेळ मुख्यमंत्र्यासाठी शहांकडे मागणी करणार : गिरीश चोडणकर

Published On: May 12 2018 1:26AM | Last Updated: May 12 2018 1:26AMपणजी : प्रतिनिधी

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या गोवा दौर्‍याच्यावेळी त्यांची भेट घेऊन राज्याला पूर्णवेळ मुख्यमंत्री द्यावा, अशी मागणी प्रदेश काँग्रेस करणार आहे, अशी माहिती   काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिली.  चोडणकर यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा ताबा घेतल्यानंतर  शुक्रवारी गोवा प्रदेश काँग्रेस समितीची पहिली बैठक घेण्यात आली. या बैठकीत विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर, माजी मुख्यमंत्री तथा मडगावचे आमदार दिगंबर कामत, नुवेचे आमदार विल्फ्रेड डिसा, थिवीचे आमदार निळंकठ हळर्णकर, वेळ्ळीचे आमदार फिलीप नेरी फेर्रांव, माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप व अन्य नेते हजर होते. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत चोडणकर बोलत होते.

ते म्हणाले की, गेले तीन महिने राज्यात मुख्यमंत्र्यांविना कारभार  सुरू असून राज्यातील प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. पर्रीकर यांच्याविषयी आम्हाला पूर्ण सहानुभूती असली तरी एका व्यक्‍तीमुळे राज्याला वेठीस धरले जाऊ शकत नाही. शहा यांच्याकडे ही मागणी नेमकी कशा प्रकारे केली जाणार, ते त्याचवेळी जाहीर केले जाईल. ‘प्रथम राष्ट्र, नंतर राज्य आणि सर्वात शेवटी व्यक्ती’ असा भाजपचा नेहमीच नारा असायचा.  मात्र गोव्यात या नार्‍याच्या उलटा कारभार सुरू असल्याचे दिसून येत आहे. एका व्यक्तीसाठी संपूर्ण राज्य  वेठीस धरले जात आहे. यासाठी भाजपचे नेते शहा यांच्याकडे गोव्याला पूर्णवेळचा मुख्यमंत्री नेमावा, अशी मागणी काँग्रेसतर्फे करण्यात येणार आहे. राज्यात 2017 साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला जनादेश मिळाला असतानाही सत्ता काबिज करण्यामागे शहा यांचा हात असून आता शहा यांनी राज्याला नेतृत्व करण्यासाठी मुख्यमंत्री द्यावा, अशी भूमिका राहिल, असे चोडणकर यांनी नमूद केले. 

जनतेची मते जाणून घेणार  

काँग्रेसचा राज्यात प्रचार करण्यासाठी पक्ष कार्यकर्ते ‘जनतेचे गार्‍हाणे, आमचे भोवंडी’ या कार्यक्रमांतर्गत राज्यातील बस, रिक्षा, टॅक्सी, मोटारसायकल पायलट आदी सार्वजनिक वाहतूक  सेवेचा वापर करणार आहेत. शहर वा गावातील बाजारासारख्या मध्यवर्ती ठिकाणी लोकांना भेटून त्यांचे मत जाणून घेतले जाणार आहे.  तसेच चाळीस मतदारसंघांत घरोघरी जाऊन नव्या सदस्यांची  नोंदणी करण्याचा कार्यक्रम आखला असल्याची माहितीही चोडणकर यांनी दिली.