Sat, Apr 20, 2019 08:37होमपेज › Goa › ‘फार्मोलिन’अहवालांबाबत स्पष्टीकरणाची मागणी

‘फार्मोलिन’अहवालांबाबत स्पष्टीकरणाची मागणी

Published On: Jul 17 2018 1:33AM | Last Updated: Jul 16 2018 11:18PMपणजी : प्रतिनिधी

मडगाव येथील घाऊक मासळी बाजारात विकल्या जाणार्‍या मासळीत आढळून आलेल्या फार्मोलिन या घातक रसायनासंबंधी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी करून प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी पाच आमदारांच्या नेतृत्त्वाखाली अन्‍न व औषध प्रशासनाच्या संचालकांना सोमवारी घेराव घातला. काँग्रेसतर्फे  मागणीचे निवेदनही सादर करण्यात आले. फार्मोलिनविषयी दोन भिन्न अहवालांबाबत   काँग्रेसने  अन्‍न व औषध प्रशासनाच्या संचालकांना  धारेवर धरले. 

काँग्रेसचे वेळ्ळीचे आमदार फिलीप नेरी रॉड्रिग्स,  नुवेंचे आमदार विल्फ्रेड डिसोझा, सांताक्रुझचे आमदार  टोनी फर्नांडिस, कुंकळ्ळीचे आमदार क्‍लाफासिओ डायस, सांतआंद्रेचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा, प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो,  पणजीचे माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो, नेते  अमरनाथ पणजीकर यांचा समावेश होता.काँग्रेस प्रवक्‍ते संकल्प आमोणकर म्हणाले, मडगाव येथील घाऊक मासळी बाजारात विकल्या जाणार्‍या मासळीत फार्मोलिनचा वापर होत असल्याच्या संशयावरून अन्‍न व औषध प्रशासनाने छापा टाकला. परंतु त्यानंतर मासळीच्या नमुन्यात आरोग्याला घातक काहीच आढळले नसल्याचा पवित्रा प्रशासनाने घेतला. कुठल्या आधारावर मासळीत  फार्मोलिनचा अंश नाकारण्यात आला? यासाठी कुठली प्रक्रिया पाळण्यात आली याबाबत  प्रशासनाने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी करुन  अन्‍न व औषध प्रशासनावर धडक मोर्चा नेला, असेही त्यांनी सांगितले.

अन्न आणि औषध प्रशासनाच्या संचालिका ज्योती सरदेसाई यांना त्यावर समाधानकारक उत्तर देता आले नाही. फार्मोलिनयुक्त मासळी सेवन  करणे आरोग्यासाठी घातक आहे. फार्मोलिनचा मासळीत मर्यादित प्रमाणात वापर चालू शकतो, असे प्रशासनाकडून सांगण्यात येते. परंतु मर्यादित प्रमाण म्हणजे नक्‍की किती याचे उत्तर मात्र सरदेसाई यांना  देता आले नसल्याचेही आमोणकर यांनी सांगितले.