Wed, Jul 17, 2019 20:02होमपेज › Goa › स्टॉलसाठी कमिशनची मागणी

स्टॉलसाठी कमिशनची मागणी

Published On: Jul 27 2018 1:24AM | Last Updated: Jul 27 2018 1:24AMपणजी : प्रतिनिधी

गोवा पर्यटन प्रोमोशनसाठी आयोजित केल्या जाणार्‍या प्रदर्शने तसेच कार्यक्रमांमध्ये स्टॉल उभारण्यास इच्छुक असलेल्या गोमंतकीयांकडून 30 टक्के कमिशनची मागणी केली जात असल्याचा आरोप  मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी विधानसभेत गुरूवारी प्रश्‍नोत्तर तासात केला.त्यानंतर  पर्यटनमंत्री बाबू  आजगावकर यांनीही त्यांच्यावर प्रत्यारोप केले. या आरोप-प्रत्यारोपांमुळे सभागृहात काहीकाळ गोंधळाची स्थिती निर्माण  झाली.  अखेर सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी सोपटे व मंत्री आजगावकर यांना शांत राहण्यास सांगून प्रश्‍नोत्तर तासातील दुसरा प्रश्‍न चर्चेस घेतला. 

गोवा पर्यटन प्रोमोशनसाठी उपक्रम आयोजनाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात सरकारी निधीचा चुराडा केला जातो. हा पैसा जनतेचा असून ही बाब गंभीर आहे. गोवा  पर्यटन प्रोमोशनसाठी आयोजित केल्या जाणार्‍या प्रदर्शने, कार्यक्रमांमध्ये स्टॉल उभारण्यास इच्छुक असलेल्या गोमंतकीयांकडे 30 टक्के कमिशनची मागणी केली जातेे. तशा तक्रारी मुख्यमंत्र्यांकडेही आल्याचे आमदार दयानंद सोपटे यांनी सांगताच पर्यटन मंत्री आजगावकर खवळले. आरोप करु नका, असे म्हणत आरोप सिध्द करा, असे आव्हान आमदार सोपटे यांना पर्यटनमंत्री आजगावकर यांनी  दिले. कमिशनच्या विषयावर  आमदार सोपटे व मंत्री आजगावकर यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या.  त्यामुळे सभागृहात गोंधळ झाला.

आमदार सोपटे म्हणाले, गोवा पर्यटनवृध्दीसाठी प्रोमोशनसाठी राज्य पातळीवरील मार्केटींग व प्रोमोशन समिती (एसएलएमपीसी) स्थापन करण्यात आली आहे. पर्यटन खात्याच्या अधिकार्‍यांबरोबरच अन्य सदस्यांचाही त्या समितीत समावेश आहे. समितीचे काम कशा पध्दतीने चालते, अशी विचारणा सोपटे यांनी केली. मंत्री आजगावकर म्हणाले, एसएलएमपीसीमध्ये ज्या अन्य सदस्यांचा समावेश करण्यात आले आहे, ते पर्यटन क्षेत्राशी संबंधित घटक आहेत. सदर समिती ही कार्यक्रम आयोजक कंपनीच्या कामाची पाहणी करते. एखाद्या कंपनीचे काम समाधानकारक आहे की नाही याची  पाहणी केली जाते. समितीचे सर्व काम पारदर्शक  असून ते कायद्यामुसार चालत असल्याचेही त्यांनी सांगितले.