Mon, Jun 17, 2019 05:01होमपेज › Goa › खाण अवलंबितांचे उद्याचे आंदोलन स्थगित

खाण अवलंबितांचे उद्याचे आंदोलन स्थगित

Published On: Jun 03 2018 1:13AM | Last Updated: Jun 03 2018 12:24AMपणजी : प्रतिनिधी

खाणबंदीची समस्या सोडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून आठवड्याभरात तोडगा काढला जाणार असल्याचे आश्‍वासन  

कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांनी दिल्याने गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटचे सोमवारपासून सुरू होणारे धरणे आंदोलन स्थगित केले आहे. येत्या 7 जूनपर्यंत तोडगा काढण्यास राज्य सरकारला अपयश आले तर राजधानी पणजीत 11 जून रोजी आणि त्यानंतर नवी दिल्लीतही तीन दिवसांचे धरणे धरण्यात येणार आहे, असा इशारा गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटचे अध्यक्ष पुती गावकर यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला. 

गावकर म्हणाले की, उसगाव येथे शुक्रवारी झालेल्या महासभेत गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटने सोमवारपासून पणजीत आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला होता.  

येत्या पावसाळी अधिवेशनाच्या काळातही आंदोलन सुरु ठेवण्याचे फ्रंटने निश्चित केले होते. आमदार नीलेश काब्राल शुक्रवारी संध्याकाळी दिल्लीहून परत आल्यावर थेट विमानतळावरुन महासभेला आले होते. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांना भेटता आले नाही, परंतु  6 किंवा 7 जून रोजी पुन्हा दिल्लीला शिष्टमंडळ जाऊन त्यांची भेट घेणार असल्याचे  सांगितले होते. काही तरी सकारात्मक घडणार, असे आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले होते.

यामुळे मंचच्या सदस्यांनी आपला आंदोलनाचा निर्णय तात्पुरता स्थगित करुन 7  जूनपर्यंत पंतप्रधानांच्या निर्णयाची प्रतीक्षा करण्याचे ठरवले आहे. सरकारकडून जर 7 जूनपर्यंत आम्हाला ठोस निर्णय कळला नाही तर आम्ही 11 जून रोजी पणजी येथे धरणे आंदोलन सुरु करणार. आगामी विधानसभा अधिवेशनाच्या सत्राच्या पहिल्या दिवशी सचिवालयांकडे निषेध मोर्चा नेणार आणि खाण व्यवसाय सुरु करण्यासंबंधी ठराव घ्यायला सर्व आमदारांना भाग पाडणार आहे. 12 जून रोजी साखळी, धारबांदोडा आणि सावर्डे येथेही धरणे आंदोलन केले  जाणार आहे.  अखिल गोवा मशीन्स मालक संघटनेचे अध्यक्ष संदीप परब, देवानंद परब, प्रकाश गावस, सुरेश देसाई आणि बालाजी देसाई यावेळी उपस्थित होते.

मंचातर्फे योग्य शासकीय परवानगी घेऊन आणि शांततेने निदर्शने केले जाणार आहेत.  आम्ही दिल्लीत जाऊनही तीन दिवस धरणे धरणार आहोत. लोकप्रतिनिधींनी आणि एक लाख खाण अवलंबितांनी सही केलेले निवेदन पंतप्रधानांना देणार आहोत. भाजप, काँग्रेस, मगो पक्ष, गोवा फॉरवर्ड आणि राष्ट्रवादीचे नेते आपले मतभेद बाजूला ठेवून खाण व्यवसाय सुरू व्हावा यासाठी एकत्र आले आहेत. खाणीसंबंधी समस्येचे निराकरण करण्यासाठी आणि खाणकाम पुन्हा सुरू करण्यासाठी अध्यादेश काढण्यात यावा, या सूचनेला सर्वांनी आपले समर्थन दिले आहे. - पुती गावकर, गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटचे अध्यक्ष